आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक व ज्येष्ठ संगीतकार सुरमणी पं. प्रभाकर धाकडे कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 08:58 PM2023-01-07T20:58:27+5:302023-01-07T20:59:09+5:30
Nagpur News आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक आणि ज्येष्ठ संगीतकार सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते.
नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक आणि ज्येष्ठ संगीतकार सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. त्यांच्यावर वर्धा महामार्गावरील स्वास्थ्यम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा उत्कर्ष निर्माण, सदर येथील निवाससस्थानावरून निघेल.
भास्कर संगीत विद्यालय
- धाकडे गुरुजी यांच्या वडीलांनी बालाजीपंतांनी १९६६ साली इंदिरानगर येथील कार्पोरेशनच्या शाळेत स्थापन केलेल्या भास्कर संगीत महाविद्यालयातूनच त्यांनी संगीताचे धडे गीरवले. वडील हेच त्यांचे पहिले गुरू होते. भास्कर हे पं. प्रभाकर धाकडे यांचे मोठे बंधू होते. ते उत्तम तबलावादक होते. मुंबईला त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ भास्कर हे नाव संगीत विद्यालयाला देण्यात आले होते. याच महाविद्यालयातून असंख्य विद्यार्थी निघाले असून, ते आत देशविदेशात संगीताची जादू पसरवत आहेत. त्यांची मुले मंगेश आणि विशाल हे सुद्धा संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत.
दृष्टीबाधित गुरुजींचे दिव्य संगीत दर्शन
- धाकडे गुरुजी म्हणूनच विख्यात असलेले सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्या संगीतसाधनेचा देश-विदेशात मोठा चाहता वर्ग आहे. दृष्टीबाधित असतानाही संगीतसाधनेच्या दिव्य दृष्टीने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते ९ वर्षांचे असताना वडिलांनी त्यांना अंध विद्यालयात शिकण्यास पाठविले होते. तेथे ते अंध मुलांच्या आर्केस्ट्रॉत फिमेल व्हाईसमध्ये गात असत. १९६५ साली विशारद झाल्यावर १९६६ मध्ये ते एससीएस गर्ल्स स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून रूजू झाले. बनारसचे पं. गोपालकृष्णन व एम. राजन यांच्या व्हायोलिन वादनाने ते प्रभावित झाले होते. गायकी अंगाने व्हायोलिन वाजविणारे ते दुर्मिळ कलाकार होते. धाकडे गुरुजी पुढे व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली आणि शाळेत शिक्षण घेत असतानाच मुलांसाठी गाणी कंपोझ करू लागले आणि पुढे त्यांच्या चालिंवर हरिहरन, शंकर महादेव, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांनी गाणी गायली आहेत.
बुद्ध-धम्म गीतांना दिली वेगळी ओळख
- शाळेत शिकवित असतानाच त्यांनी बुद्ध गीत रचण्याचा पायंडा पाडला आणि बुद्ध-धम्म गीतांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. गुरुजींचे विद्यार्थी देशविदेशात असून विदेशातील अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांच्या व्हायोलिनची जादू फिरविली होती. देशातील ते एक नामवंत असे संगीततज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. अनेक चित्रपटातील गीतांना त्यांनी संगीत दिले आहे.
‘सुरमणी’ ही उपाधी
- १९८३ साली सुरसिंगार मुंबईच्या वतीने त्यांना ‘सुरमणी’ ही उपाधी बहाल करण्यात आली. त्याच वर्षी जपान येथे पार पडलेल्या दिव्यांगांच्या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. पुन्हा १९९० साली त्यांना ही संधी दुसऱ्यांदा मिळाली. ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’ ही त्यांची कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली आहे. २००९ साली ते आकाशवाणीतून निवृत्त झाले होते.
गुरुपौर्णिमा उत्सव- त्यांच्या शिष्य वर्गाकडून दरवर्षी नियमितपणे गुरुपौर्णिमेला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते आणि शिष्यवर्ग त्यांच्या दर्शनासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी दूरवरून येत होता.
.................