आघाडीच्या काळात चौकशी झाली, पुन्हा चौकशीस तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 10:53 PM2023-02-04T22:53:16+5:302023-02-04T22:53:50+5:30
Nagpur News आता पुन्हा कुणाला चौकशी करायची असेल तर आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मांडली.
नागपूर : बावनकुळे यांच्या मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. यावर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या काळातच आपली चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा कुणाला चौकशी करायची असेल तर आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मांडली.
बावनकुळे म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासच्या समोर जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले असता महाविकास आघाडी सरकारने राजकीय द्वेषातून गुन्हे दाखल केले होते. आता आपण न्यायालयासमोर संबंधित गुन्हा रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या दोन जागांसाठी होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनाही विनंती करण्यात आली आहे. तसेही वर्षभरानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्रीच बोलतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.