बैस हत्याकांड प्रकरणात संशयितांची विचारपूस ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:57+5:302021-03-13T04:10:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरेवाडा येथे झालेल्या भय्यालाल सिंह बैस हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी काही संशयितांची विचारपूस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथे झालेल्या भय्यालाल सिंह बैस हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी काही संशयितांची विचारपूस केली आहे. त्यात हत्येशी संबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांनी पोस्टमार्टमच्या आधारावर आता हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निष्काळजीपणामुळे बैसचा मृत्यू झाल्याची चर्चा असल्याने मानकापूर पोलिसात खळबळ उडाली आहे.
९ मार्च रोजी सायंकाळी ४.४० वाजताच्या दरम्यान गोरेवाड्यातील एका निर्जनस्थळी लोखंडे ले-आऊट येथील रहिवासी ६४ वर्षीय बैस यांचा मृतदेह आढळून आला. बैस यांच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसून येत होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गती आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत १५ पेक्षा अधिक संशयितांची विचारपूस केली आहे. बैस यांचे जामठ्यात वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीचा अनेक दिवसापासून न्यायालयात वाद सुरू आहे. या जमिनीच्या वादातून खून झाल्याची शंका वर्तविली जात होती. बैस हे ८ मार्च रोजी तहसील कार्यालयात जाण्यासाठी घरून निघाले होते. तेव्हापासूनच त्यांचा पत्ता नव्हता.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोपही गंभीर आहे. लाेकांचे म्हणणे आहे की, ८ मार्च रोजी सकाळी बैस जखमी अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांना याची सूचना देण्यात आली. परंतु मानकापूर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ पडून असल्याने बैस यांचा मृत्यू झाला. दुपारी नागरिकांनी जेव्हा पुन्हा याची माहिती दिली, तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बैस यांचा मृत्यू झाला होता. यासाठी दोषी असलेल्या पोलिसांचा पत्ता लावला जात आहे.