नागपुरात आंतरराज्यीय बॅगलिफ्टर टोळीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:13 PM2018-09-15T23:13:09+5:302018-09-15T23:15:25+5:30
अनेक राज्यात बॅगलिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा छडा लावून टोळीच्या म्होरक्यासह दोघांच्या मुसक्या बांधण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या दोघांकडून पोलिसांनी रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि शस्त्रेही जप्त केली. परिमंडळ-४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक राज्यात बॅगलिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा छडा लावून टोळीच्या म्होरक्यासह दोघांच्या मुसक्या बांधण्यात नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या दोघांकडून पोलिसांनी रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि शस्त्रेही जप्त केली. परिमंडळ-४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
बुद्धू ऊर्फ संजयसिंह उमाशंकरसिंह करवल (वय ३२, रा. राजगड, जि. मिझार्पूर, उत्तर प्रदेश) आणि जानी ऊर्फ आनंद आरमुख पांडे (वय २४, रा. शहाडोल, मध्य प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. बँकेत किंवा आजूबाजूला उभे राहायचे. मोठी रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीचा पाठलाग करायचा आणि जेथे संधी मिळेल तेथे रक्कम लंपास करायची, अशी या टोळीतील गुन्हेगारांची कार्यपद्धत आहे.
काही दिवसांपूर्वी भीमराव गाडबैल (रा. कळमना) यांनी नंदनवनमधील बँक आॅफ बडोदा येथून १ लाख ३० हजाराची रोकड काढली. ती डिक्कीत ठेवून ते दुचाकीने घराकडे निघाले. त्यांचा पल्सरने पाठलाग करून बुद्धू आणि जानीने ही १ लाख ३० हजारांची रोकड लंपास केली. बेलतरोडीत एका घरासमोर उभ्या असलेल्या कारमधून १ लाख १५ हजारांची रोकड लांबविली तर, अंबाझरीत एका व्यक्तीच्या दुचाकीला अडकवलेली ६० हजार रुपयांची बॅगही त्यांनी हिसकावून पळ काढला होता.
नंदनवनमधील गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोधाशोध केली. जेथे ही घटना घडली होती, त्या ठिकाणी एका इमारतीवर सीसीटीव्ही होता. त्यात संपूर्ण घटनाक्रम कैद झाला. त्यावरून पोलिसांना आरोपींचे चेहरेवगैरे कळले, मात्र दुचाकीचा क्रमांक कळत नव्हता. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर आरोपींची दुचाकी सीताबर्डीतील अभिषेक लॉजसमोर आरोपींनी उभी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यावरून पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी तेथे छापा मारला. यावेळी आरोपी बुद्धू लॉजमध्येच पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्याच्या साथीदारांचीही नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन जानीच्या मुसक्या बांधल्या. या दोघांनी नंदनवन, अंबाझरी आणि बेलतरोडीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून पोलिसांनी रोख १०,१५० रुपये, एक होंडा सिटी कार, पल्सर तसेच चाकू, मोठ्या संख्येत दुचाकींच्या चाव्या आणि डिक्की फोडण्यासाठी वापरण्यात येणारे पेचकस तसेच ब्लेड जप्त केले. या आरोपींची पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून, त्यांनी नागपूरसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही अनेक गुन्हे केल्याची माहिती उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितली. यावेळी नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण हजर होते. ही कामगिरी पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंखे, सहायक निरीक्षक पी. डी. घाडगे, हेमंत थोरात आणि त्यांच्या सहकाºयांनी बजावली.
जावयाने दिले धडे
आरोपी बुद्धू ऊर्फ संजय सिंह या टोळीचा म्होरक्या असून, हायप्रोफाईल लाईफस्टाईल त्याला आवडते. तो ब्राण्डेड कपडे, परफ्युम, शूज, गॉगल वापरतो. त्याला त्याच्या जावयानेच आठ वर्षांपूर्वी लुटमारीचे धडे शिकवले. दोन वर्षे विविध राज्यात त्याच्या टोळीत काम केल्यानंतर आरोपी बुद्धूने आपली स्वत:ची टोळी तयार केली. त्याने लुटीच्या पैशातून दोन कार विकत घेतल्या. लुटमार करताना कुणाला मारहाण करण्याचा धोका त्याची टोळी पत्करत नाही. थेट बँकेत जायचे, तेथे कोण किती रक्कम काढतो त्यावर लक्ष ठेवायचे. नजरेत आलेले सावज बँकेबाहेर पडताच त्याचा दोन पल्सरने पाठलाग करायचा. संबंधित व्यक्तीच्या दुचाकीचा वेग कमी होताच त्याने रोकड ठेवलेली बॅग हिसकावून पळ काढायचा, अशी त्यांची कार्यपद्धत आहे. बँकेतून रोकड घेऊन बाहेर पडलेल्यांव्यतिरिक्त ते दुसऱ्या कुणालाही लुटत नव्हते, हे विशेष!