वृद्ध नागरिकांना ‘टार्गेट’ करणारी चोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 10:11 PM2022-08-23T22:11:53+5:302022-08-23T22:12:32+5:30
Nagpur News वृद्ध नागरिक तसेच महिलांना ‘टार्गेट’ करून त्यांना लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर : वृद्ध नागरिक तसेच महिलांना ‘टार्गेट’ करून त्यांना लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. गोपाल अर्जुन बघेल (२७, रा. बेसा रोड, बेलतरोडी) आणि शंकर उर्फ शंकी चुनीलाल दाभी (२५, रा. उज्जैन, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
नारा येथील ६० वर्षीय लीलाबाई वामन बरवट या १० जून रोजी सायंकाळी बारसे नगर घाटासमोरून जात होत्या. मार्गात लीलाबाईंना दोन तरुण भेटले. गोष्टीत गुंतून त्यांनी लीलाबाईंना काही अंतरावर नेले. त्यांच्याकडे नोटांचे बंडल असल्याची बतावणी करण्यात आली. लीलाबाई यांना कापडात गुंडाळलेले कागदाचे बंडल देऊन त्यांच्याकडील ३७ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेत फरार झाले. पाचपावली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासून गोपाल बघेलचा यात सहभाग असल्याचे पोलिसांना कळले. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले. पाचपावलीशिवाय सक्करदरा आणि बजाजनगर येथेही त्याने गुन्हे केल्याचे सांगितले. त्याच्या माहितीवरून शंकरलादेखील अटक करण्यात आली.
आरोपी अनेक दिवसांपासून ही टोळी चालवत होते. ते वेगवेगळ्या शहरात फिरून वृद्ध किंवा महिलांना ‘टार्गेट’ करायचे. समोरच्याला बोलण्यात गुंतवून ते दागिने उडवायचे. आरोपींकडून दागिन्यांसह १.७४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.