११७ कार्ड्स वापरून ‘एटीएम हातचलाखी’चे आंतरराज्यीय रॅकेट
By योगेश पांडे | Published: August 22, 2024 04:53 PM2024-08-22T16:53:26+5:302024-08-22T16:59:16+5:30
आरोपींना उत्तरप्रदेशातून अटक : २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, चार दिवसांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएम मशीनमध्ये पैसे काढायला आलेल्या बॅंक ग्राहकांना टार्गेट करून कार्ड बदलवत गंडविणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. आरोपींकडे पोलिसांना विविध बॅंकांचे ११७ एटीएम कार्ड आढळले व त्यांच्या माध्यमातूनच आरोपी ‘एटीएम हातचलाखी’चे आंतरराज्यीय रॅकेट चालवत होते. तिघांमध्ये दोन जण मुंबईचे रहिवासी आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
१६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त अभियंता पांडुरंग नारायण कुर्वे (७२, भरतनगर) हे पैसे काढण्यासाठी रवीनगरातील एचडीएफसीच्या एटीएममध्ये गेले होते. पैसे काढत असताना अचानक एक पुरुष आतमध्ये आला व माझे पैसे एटीएममध्ये अडकले आहे. तुमची रिसिप्ट अडकली आहे. तुम्ही ती रिसिप्ट काढण्यासाठी परत एटीएम कार्ड स्वॅप करा असे त्याने म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून कुर्वे यांनी मशीनमध्ये एटीएम कार्ड स्वॅप केले. त्यावेळी आरोपीने त्यांचा पिनकोड पाहिला. त्यानंतर त्याने बोलताबोलता कुर्वे यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातून एकूण ९० हजार रुपये काढल्याचा त्यांना एसएमएस आला. यामुळे घाबरलेल्या कुर्वे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच आजुबाजूच्या सीसीटीव्हीमध्येदेखील पाहिल्यावर एकूण तीन आरोपी असल्याची बाब समोर आली. ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपी जबलपूरमार्गे उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्याची माहिती कळाली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील पथक प्रयागराजकडे रवाना झाले. पोलिसांनी सय्यद खान कमालुद्दीन खान (३४, वडाळा, मुंबई), आलोककुमार बालकृष्ण गौतम (३२, प्रतापगड, उत्तरप्रदेश) व मोहम्मद कलीम उर्फ मोहम्मद नसीम (२१, शिवाजीनगर, मुंबई) यांना २१ ऑगस्ट रोजी अटक केली. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना नागपुरात आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, मंगेश डांगे, नवनाथ ईसाये, अभय पुडके, राजेश सोनावणे, मुनिन्द्र युवनाते, दिनेश जुगनाके, अमित भुरे, अंकुश घटी, प्रवीण शिंदे, उज्वल पाटेकर, सतिश कारेमोरे, आशीष जाधव, रोमीत राऊत, विक्रमसिंह ठाकूर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारमधून येत करायचे नागरिकांना ‘टार्गेट’
पोलिसांनी तीनही आरोपींकडून आठ लाख व अकरा लाख रुपये किंमतीच्या दोन कार, तीन महागडे मोबाईल आणि ११७ एटीएम कार्ड असा २०.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी महागड्या कारमधून येत नागरिकांना टार्गेट करायचे. एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगत ते नागरिकांची दिशाभूल करायचे व हातचलाखीने कार्ड बदलायचे. त्यांचा पिनकोड वापरत पैसे काढायचे. विशेषत: महिला व वृद्ध नागरिक त्यांच्या निशाण्यावर असायचे. नागपुरात त्यांनी अशा प्रकारे किती जणांना गंडा घातला याची चौकशी सुरू आहे