चौकशीदरम्यान सहसंचालकांकडून होऊ शकतो हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:33+5:302021-02-12T04:08:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे यांच्याविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे यांच्याविरोधात उच्चस्तरीय चौकशी लावण्यात आली आहे. मात्र पदावर असताना त्यांच्याकडून चौकशीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी ‘युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स असोसिएशन’तर्फे करण्यात आली आहे.
डॉ. महेशकुमार साळुंखे हे स्थाननिश्चितीसह विविध कामासाठी प्राध्यापकांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषदेने केला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडेदेखील या तक्रारी गेल्या होत्या. नागपूर दौऱ्यादरम्यान उदय सामंत यांनी साळुंखे यांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. ते पदावर राहिल्यास चौकशीत हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसेच चौकशी समितीवर शिक्षक, शिक्षकेतर व व्यवस्थापन प्रतिनिधी नेमावा, अशी मागणीही ‘युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स असोसिएशन’चे सचिव डॉ. अनिल दोडेवार यांनी केली आहे.