मुलाखत कक्ष बनले भ्रष्टाचार कक्ष
By admin | Published: April 12, 2015 02:41 AM2015-04-12T02:41:46+5:302015-04-12T02:41:46+5:30
निलंबित अधीक्षक वैभव कांबळे, पारेकर आणि आत्राम हे स्वत:च्या मर्जीने मुलाखत कक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत होते.
निलंबित अधीक्षक वैभव कांबळे, पारेकर आणि आत्राम हे स्वत:च्या मर्जीने मुलाखत कक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातून दहा हजार रुपये हे या अधिकाऱ्यांना मिळत होते. श्रीकृष्ण राहाटे, गोपाल कचरे, उदय जाधव आणि अशोक भंडारकर, हे त्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी होते. त्यापैकी भंडारकर हा निलंबित झाला आहे.
नियमाप्रमाणे न्यायाधीन बंद्याची मुलाखत त्याच्या नजीकच्या नातेवाईकाला आठवड्यातून केवळ एकच दिवस घेता येते. मुलाखतीचा वेळ केवळ दहा मिनिटे असतो. शिक्षा झालेल्या कैद्याची मुलाखत महिन्यातून केवळ एकदाच दिली जाते. परंतु हे कर्मचारी राजा गौस, भास्कर अण्णा, डल्लू सरदार, भुरू आणि अन्य भाई लोकांची त्यांच्या नातेवाईकांना व साथीदारांना आठवड्यातून चार-पाच दिवस मुलाखती देत होते. या मुलाखतीही तास-दोन तास राहत होत्या. प्रत्येक मुलाखतीचे दोन ते तीन हजार रुपये घेतले जात होते. कारागृहात आवकच्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून जेलर रणदिवे, आशिष आणि सचिन नावाचे कर्मचारी वसुली करायचे. वसुली पथक म्हणूनच त्यांची कारागृहात ओळख आहे.
राजा गौस आता अंडासेलमध्ये
मोक्काच्या प्रकरणातील राजा गौसचे तीन साथीदार आणि अन्य दोघे, असे एकूण पाच जण ३१ मार्च रोजी कारागृहातून पळून गेल्याचे उघडकीस येताच राजा गौसला पुन्हा छोटी गोलमधून अंडासेलमध्ये टाकण्यात आले आहे. सहा-सात महिन्यापूर्वीच मोठी रक्कम घेऊन त्याला अंडासेलमधून काढून छोटी गोलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला खास निगराणीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतरच त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला छोटी गोलमध्ये ठेवून न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात आला. छोटी गोलमध्ये शिक्षा झालेल्यांना आणि खतरनाक न्यायाधीन बंद्यांना ठेवले जाते. बडी गोलमध्ये सर्वच न्यायाधीन बंदी ठेवले जातात. टोळीवाल्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते. परंतु मोठी रक्कम घेऊन टोळीतील गुन्हेगारांना एकत्र ठेवले जात होते.
पुन्हा आढळले मोबाईल
गडचिरोली कारागृहाचे अधीक्षक आडे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सकाळी कारागृहाची झडती घेतली. त्यांना प्रेस (मुद्रणालय) या ठिकाणी सहा मोबाईल, सहा चार्जर, बॅटऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. या शिवाय छोटी गोलमध्ये दोन आणि बडी गोलमध्ये एक मोबाईल आढळून आला.