तिकिटांसाठी भाजप नेत्यांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:00 AM2019-09-01T01:00:43+5:302019-09-01T01:04:04+5:30

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी शहरातील सहा विधानसभा जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

Interviews by BJP leaders for tickets | तिकिटांसाठी भाजप नेत्यांनी दिल्या मुलाखती

तिकिटांसाठी भाजप नेत्यांनी दिल्या मुलाखती

Next
ठळक मुद्देफडणवीस-खोपडे यांना आव्हान नाही : उत्तर, पश्चिम, दक्षिणमध्ये इच्छुकांची गर्दीविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सत्तेत पुन्हा परत येण्याच्या तयारीला लागलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये तिकिटांच्या दावेदारांची फौज उभी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना मात्र कुणाकडूनही आव्हान मिळालेले नाही.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी शहरातील सहा विधानसभा जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यादरम्यान शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला. रविभवन येथे पार पडलेल्या बैठकीत विदर्भचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले उपस्थित होते. शहरातील सहाही विधानसभा मतदार संघाच्या जागांवर एकेक करीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर बागडे आणि कोठेकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यादरम्यान इच्छुकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. रविभवन सभागृहाबाहेर उभे राहून इच्छुक नेते व कार्यकर्ते आपल्या नंबरची प्रतीक्षा करीत होते.
दक्षिण-पश्चिम आणि पूर्व नागपूर विधानसभेसाठी एका इच्छुक उमेदवाराने मुलाखत दिली नाही. आमदारांमध्ये केवळ डॉ. मिलिंद माने यांनी मुलाखत दिली. तसे पाहता सर्वच आमदार उपस्थित होते. आमदारांचे म्हणणे आहे की, त्यांना मुलाखत देणे बंधनकारक नव्हते. त्यांची दावेदारी अगोदरपासूनच आहे. केवळ इच्छुकांसोबतच पक्षाने चर्चा केली.
दटके-पार्डीकर यांचा मध्य नागपूरसाठी दावा
मध्य नागपूरमधून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही दावा ठोकला.आ. विकास कुंभारे यांचाही या जागेसाठी दावा आहे. गुड्डू त्रिवेदी यांनीही मुलाखत दिली.

पश्चिमध्ये इच्छुकांची गर्दी
पश्चिम नागपूरचे नेतृत्व आ. सुधाकर देशमुख करीत आहेत. परंतु आज तब्बल १४ इच्छुकांनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त करीत तिकिटांवर दावा ठोकला. यामध्ये माजी महापौर माया इवनाते यांच्यासह मध्य
नागपुरातून विधानसभा निवडणूक लढवलेले दयाशंकर तिवारी यांचाही समावेश आहे. तसेच नगरसेवक भूषण शिंगणे, सुनील अग्रवाल, अश्विनी जिचकार, रमेश चोपडे, डॉ. प्रशांत चोपरा, किशन गावंडे, नवनीतसिंग तुली, जयप्रकाश गुप्ता, प्रगती पाटील, नरेश बरडे, बबन अवस्थी, संगीता गिऱ्हे यांनीही तिकिटांवर दावा केला.

उत्तरमध्येही स्पर्धा, माने यांनीही दिली मुलाखत
आज डॉ. मिलिंद माने हे तिकिटासाठी मुलाखत देणारे एकमेव भाजपचे आमदार ठरले. त्यांनी मुलाखत देऊन उत्तर नागपुरातून पुन्हा एकदा आपली दावेदारी सादर केली. त्यांच्यासोबतच संदीप जाधव, सुभाष पारधी, धर्मपाल मेश्राम, महेंद्र धनविजय, अविनाश धमगाये, बंडू पारवे, रमेश फुले, राजू बावरा, राजू हत्तीठेले, पंकज सोनकर, विद्या ठवरे, मधुसूदन गवई, बबली मेश्राम यांनीही उत्तर नागपुरातून तिकीट मिळावी, अशी मागणी केली.

तिकीट तर बंगला-वाड्यावरच निश्चित होणार
भाजपच्या तिकिटांसाठी इच्छुक असलेल्यांना विचारले असता त्यांनी एकासुरात सांगितले की, ते पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मुलाखतीसाठी आले आहेत. लोकशाही प्रक्रियेनुसार त्यांना याचा अधिकार आहे. परंतु पक्षाचे उमेदवार तर बंगला (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) आणि वाडा (केंद्रीय मंत्री नितीन गडकरी) हेच निश्चित करतील.

Web Title: Interviews by BJP leaders for tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.