रिपाइं (आ.) च्या मुलाखतीही वेगवेगळ्या
By admin | Published: January 26, 2017 02:55 AM2017-01-26T02:55:46+5:302017-01-26T02:55:46+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही.
शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही कायम : उमेदवारांमध्ये संभ्रम
नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या. पक्षाच्या सीताबडी येथील कार्यालयात राजन वाघमारे यांच्या नेतृत्वात मुलाखती घेण्यात आल्या. तर बाळू घरडे यांच्या गटाने लष्करीबाग येथील डॉ. आंबेडकर मिशन सभागृहात स्वतंत्र बैठक घेऊन मनपा निवडणुकीसाठी समिती स्थापन केली, तसेच १४ उमेदवारांच्या नावाची यादीही पक्की केली. त्यामुळे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पक्षातील शहर अध्यक्षपदाचा वाद संपल्याचे स्पष्ट करीत राजन वाघमारे हेच पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष असल्याचे जाहीर केले होते. परंतु बाळू घरडे यांचा गट अजूनही सक्रिय आहे. रिपाइं (आ.)ची भाजपसोबत युती आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच बुधवारी पक्षाच्या सीताबर्डी येथील राहुल कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर ४६ या कार्यालयात पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. २४ प्रभागातून ३२७ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी १ ते १० प्रभागातील उमेदवारांनी पक्षाच्या पार्लमेंट्रीबोर्डसमोर मुलाखती दिल्या. प्रा. पवन गजभिये, दादाकांत धनविजय, विकास गणवीर, राजन वाघमारे, भीमराव मेश्राम, विनोद थूल, हरीश लंजेवार, राजेश ढेंगरे यांनी मुलाखती घेतल्या. उद्या पुन्हा मुलाखती होतील, असे शहराध्यक्ष राजन वाघमारे यांनी सांगितले.
दुसरीकडे बाळू घरडे यांच्या नेतृत्वात लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणूक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत बाळू घरडे यांच्यासह इंजि. पद्माकर गणवीर, अॅड. भीमराव कंबळे, प्रा. संतोष रामटेके, डॉ. मनोज मेश्राम, अॅड. सुरेश घाटे, मधुकर लाडे, सुधीर नारनवरे, प्रा. राहुल वासनिक, रजनी वासनिक, सुनीता बहादुरे, बंटी अलेक्झांडर, सागर मानकर, बाबुलाल गाडे, राहुल मेश्राम, राजू गणवीर, संदेश खोब्रागडे, धर्मपाल गजभिये आणि संदेश भागवतकर यांचा समवेश आहे. या बैठकीत १४ उमेदवारांची यादीसुद्धा पक्की करण्यात आली आहे.
पक्षातफे दोन वेगवेगळ्या मुलाखती घेण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांसह सामान्य कार्यकर्त्यांमध्येसुद्धा संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)