नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्ष घेणार मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 09:19 PM2019-11-29T21:19:11+5:302019-11-29T21:20:00+5:30
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजपासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना तिकीट देताना विशेष काळजी घेतली जात आहे.
जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवायलाही सुरुवात केली आहे. लवकरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अर्ज मागविण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणारआहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांच्या जि.प. कार्यालयाकडे चकराही वाढल्या आहेत. त्यातच काँग्रेस व भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज स्वीकृतीनंतर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. काँग्रेसने शुक्रवारपर्यंत अर्ज मागविले होते तर भाजपने शनिवार ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. १ डिसेंबरपासून राकाँ व शिवसेनेकडूनही अर्ज वाटपाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे तिन्ही राजकीय पक्ष समन्वयाच्या भूमिकेत आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. काही विधानसभा मतदार संघात विशिष्ट राजकीय पक्षाचे प्राबल्य असल्याने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जि.प. व पं.स. निवडणुकीत लढविण्याचे ठरविले आहे.
उमेदवार निश्चिती भाजपा कोअर कमिटी करणार
भारतीय जनता पक्षासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक जिकरीची झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपा तयारीला लागली आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी भाजपाने कोअर कमिटी तयार केली आहे. पक्षाकडे आलेल्या अर्जाची तपासणी करून कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर संभावित उमेदवाराचा जि.प.सर्कलनिहाय सर्वे करण्यात येईल. नंतरच त्याची उमेदवारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.