इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक

By admin | Published: January 26, 2017 02:55 AM2017-01-26T02:55:02+5:302017-01-26T02:55:02+5:30

राज्यातील २५ जिल्हा परिषदेत निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक काही काळ लांबली आहे.

Intimidating candidates are intimidated | इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक

इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक

Next

जिल्हा परिषद निवडणूक : ‘आरक्षण’ वाढवितेय डोकेदुखी
गणेश खवसे   नागपूर
राज्यातील २५ जिल्हा परिषदेत निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक काही काळ लांबली आहे. वानाडोंगरी आणि पारशिवनीचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचून त्यावर तोडगासुद्धा निघाला. यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला असला तरी त्यासाठी किमान दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यातच जिल्हा परिषद क्षेत्राचे पूर्वी काढण्यात आलेले आरक्षण तर बदलणार नाही ना, अशी चिंता आता इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढवित आहे. परिणामी इच्छा असतानाही त्यांना प्रचारात ‘रस’ दिसून येत नाही.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. २०१२ च्या निवडणुकीनंतर मौदा आणि महादुला या नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर कन्हान आणि वाडी नगर परिषदेला दर्जा मिळाला. तर काही महिन्यांच्या अवधीनंतर कुही, भिवापूर आणि हिंगणा नगर पंचायत झाली. वाडी नगर परिषद होताच तेथील जिल्हा परिषद सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले. तर मौदा, महादुला, कन्हान, कुही, भिवापूर आणि हिंगणा या क्षेत्रातील सदस्यांचा मतदारसंघ काही प्रमाणात प्रभावित झाला. परंतु सदस्य मात्र कायम राहिले. या सर्व हालाचालीनंतर ५९ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५८ वर आली. तेवढ्याच सदस्यसंख्येचा विचार करून प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. सोबतच आरक्षण सोडतही काढण्यात आली. दरम्यान राज्य शासनाने वानाडोंगरीला नगर परिषदेचा तर पारशिवनीला नगर पंचायतीचा दर्जा दिला. त्यामुळे त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होऊन याचिका दाखल करण्यात आली होती.
याबाबत सर्व विचार करता नगर क्षेत्रात जिल्हा परिषदेने निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट करीत उर्वरित ठिकाणच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मात्र दोन ठिकाणच्या जागांसाठी निवडणूक न घेतल्यास या दोन मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रातही निवडणूक होणार नाही, ही बाब समोर करीत पुन्हा नव्याने प्रभागरचना निश्चित करण्यात यावी, ही मागणी समोर आली. त्यानुसार आता नव्याने प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे. असे केल्यास संबंधित क्षेत्रातील आरक्षण तर बदलणार नाही ना, अशी चिंता इच्छुक उमेदवारांना सतावत आहे.

नवी प्रभागरचना, ५८ जागा
जिल्हा परिषदसाठी पूर्वी ५९ सदस्य होते. वाडी नगर परिषद होताच एक सदस्य कमी झाला. नगर पंचायती झाल्या तरी अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्र ग्रामीण असल्याने सदस्यत्व कायम राहिले. या निवडणुकीसाठी ५८ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले होते. परंतु पारशिवनीचे नगरपंचायतमध्ये व वानाडोंगरी नगर परिषदेत रूपांतर झाल्याने जागा कमी होण्याची सर्वाधिक शक्यता होती. परंतु माहितीनुसार तेवढ्याच अर्थात ५८ जागा कायम राहणार आहेत. हिंगणा तालुक्यात आठपैकी आता सात तर उमरेड तालुक्यात एक जिल्हा परिषद क्षेत्र वाढणार असल्याची माहिती आहे.

दोन महिन्यानंतरच निवडणूक
दोन जिल्हा परिषद क्षेत्र नगर परिषद व नगर पंचायतीमुळे बाधित झाल्याने निवडणूक लांबणीवर पडली. यासाठी आता नव्याने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण आदी करावे लागणार आहे. यासाठी साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच निवडणूक होईल. पूर्णच क्षेत्राची पुनर्रचना केली जाणार नसून केवळ वानाडोंगरीसाठी हिंगणा आणि पारशिवनी नगर पंचायतसाठी पारशिवनी तालुक्याची पुनर्रचना केली जाणार असून उमरेडमध्ये एक जागा वाढविण्यासाठी तेथेही थोडेफार बदल होणार आहे. उर्वरित आरक्षण आणि सर्कल ‘जैसे थे’ राहतील.

Web Title: Intimidating candidates are intimidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.