पदोन्नतीत आरक्षणासाठी विधेयक आणणार

By admin | Published: April 15, 2017 02:20 AM2017-04-15T02:20:32+5:302017-04-15T02:20:32+5:30

पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही अनुसूचित जाती व जमातीचे

To introduce a bill to promote reservation | पदोन्नतीत आरक्षणासाठी विधेयक आणणार

पदोन्नतीत आरक्षणासाठी विधेयक आणणार

Next

रामदास आठवले : संविधान हाच सरकारचा जाहीरनामा
नागपूर : पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही अनुसूचित जाती व जमातीचे सर्व खासदार मिळून लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. संसदेत यासंदर्भात सरकारने विधेयक सादर करून याबाबत कायदा करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात ते सोबत होते. विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना रामदास आठवले म्हणाले, आरक्षण व इतर मुद्यांबाबत भाजपाचा जाहीरनामा काहीही असला तरी सरकारचा जाहीरनामा मात्र संविधान हाच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यघटना कधीही बदलू शकत नाही. स्वत: पंतप्रधान मोदी यांनीच अनेकदा याबाबत स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार चांगले काम करीत आहे. दोन वर्ष शिल्लक आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी बदल्यांसाठी न भेटता सामाजिक न्यायाशी संबंधित प्रकल्प व योजनांसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत त्यांना विचारणा केली असता याबाबत आपल्याला माहिती नाही. काही गडबड झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. एससी, एसटी, व ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणातून मराठा व इतर समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येऊ शकते. यासाठी कायदा करावा, असेही त्यांनी सुचविले. पत्रपरिषदेत भूपेश थुलकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, पवन गजभिये, भीमराव बन्सोड, अनिल गोंडाणे, आर.एस. वानखेडे, भीमराव कांबळे, भीमराव मेश्राम, विकास गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दलित युवकास कर्ज न देणाऱ्या बँकेवर कारवाई
देशभरात विविध बँकांच्या १.२५ लाख शाखा आहेत. प्रत्येक शाखेने एका दलिताला स्वयंरोजगारासाठी कर्ज द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. यासंदर्भात सर्वे करण्यात येईल. ज्या बँक दलित युवकाला कर्ज देणार नाहीत, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पाकिस्तानला अद्दल घडविण्याची गरज
भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेली फाशीची शिक्षा ही राजकारणाने प्रेरित आहे. कुणालाही पुरावा नसताना शिक्षा देता येऊ शकत नाही. दहशतवादी कसाबलाही थेट फासावर चढवण्यात आले नव्हते. पाकिस्तानचे हे कृत्य एकूणच चिथावणीखोर असून त्याला अद्दल घडविण्याची गरज आहे.

पक्षातील वाद १५ दिवसात संपवणार
रिपाइं (आ)मध्ये शहर व प्रदेश कार्यकारिणीत सुरू असलेला वाद येत्या १५ दिवसात संपविण्यात येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला. एकूणच कार्यकारिणीची रचना नव्याने केली जाईल. जे काम करणारे असतील अशा कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. जे काम करणार नाही, त्यांना पक्षातून काढणार नाही, परंतु दुसरे काम सोपविले जाईल. परंतु निष्क्रिय कार्यकर्ता पदावर राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग पद्धतीमुळे
रिपाइंचे नुकसान
राज्यात प्रभाग पद्धतीने मनपाच्या निवडणुका झाल्या. प्रभाग पद्धती अतिशय चुकीची असल्याचे स्पष्ट करीत रामदास आठवले यांनी प्रभागामुळे रिपाइंचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले. ईव्हीएम मशीनच्या गडबडीबाबत त्यांना विचारले असता काही मशीन खराब होऊ शकतात. परंतु पूर्णपणे हॅक करता येणे शक्य नाही. जे हरतात ते आरोप करतात, असेही आठवले म्हणाले.

Web Title: To introduce a bill to promote reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.