अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्यांना निवृत्ती वेतन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:51+5:302021-05-11T04:08:51+5:30
ऑफ्रोहची मागणी ; आंदोलनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे फसवणुकीने अवैध केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ...
ऑफ्रोहची मागणी ; आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे फसवणुकीने अवैध केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे त्यांना मागील दीड वर्षापासून निवृत्ती वेतन दिले नाही. या कालावधीत अनेक कर्मचारी नैसर्गिकरीत्या तसेच कोरोनामुळे मृत्यू पावल्याने या कर्मचाऱ्यांना त्वरित निवृत्ती वेतन सुरू करण्याची मागणी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
अधिसंख्य पदाचे सेवा नियम ठरविण्यासाठी २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला; परंतु अद्याप या समितीने कोणताही निर्णय घेतला नाही. अनेक कर्मचारी मृत पावले. तसेच कोरोनामुळे सुद्धा काहींचा मृत्यू आला. या कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांचे सर्व सेवानिवृत्तीविषयक लाभ देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष दामोधर खडगी, संजय नंदनकर, पितांबर तायवाडे, रामचंद्र खोत, विनोद पराते, नारायण वानखेडे, मुरलीधर सोनकुसरे यांनी दिली.