आॅरेंज सिटीला ‘एरोसिटी’ची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:39 AM2017-10-28T01:39:33+5:302017-10-28T01:39:46+5:30

Introduction of 'Aerocracy' to Orange City | आॅरेंज सिटीला ‘एरोसिटी’ची ओळख

आॅरेंज सिटीला ‘एरोसिटी’ची ओळख

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही वर्षांपूर्वीचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनच्या राफेल फायटर जेट विमानाचे सुटे भाग आणि याच कंपनीची फाल्कन बिझनेस विमाने मिहानमधील धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये तयार होतील. अनिल अंबानी यांनी या प्रकल्पासाठी नागपुरातील मिहानची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पामुळे आॅरेंज सिटी नागपूर आता एरोसिटी म्हणून जगभर ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
विदर्भात विकासाला चालना मिळणार :गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यानंतर मिहानमध्ये सुरू होणाºया या प्रकल्पामुळे विदर्भातील विकासाला मोठी चालना आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल. प्रकल्पात एप्रिल २०१८ पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे सहयोगी उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील. रिलायन्स समूहाने लाखो भारतीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. धीरुभाई अंबानी यांनी दूरदृष्टीने उद्योग जगतात नावलौकिक मिळविला आहे.
४०० सहयोगी कंपन्यांना कामे मिळणार
लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळे भारतातील सुमारे ४०० सहयोगी कंपन्यांना कामे मिळतील. सोबतच या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्पात पाच वर्षांनी दरवर्षी किमान २२ फाल्कन-२००० विमानांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मिहान-सेझमधील १२६ एकरमध्ये धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री फडणवीस हस्ते शुक्रवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. समारंभात फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, फ्रान्सचे राजदूत अ‍ॅलेक्झेंडर जिग्गलर, फ्रान्सच्या डॅसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रापियर आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, त्यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, पत्नी टीना अंबानी, मुलगा अनमोल अंबानी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगाला अधिक समृद्ध करण्यासाठी लोकशाही राष्ट्रांनी परस्परांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी नागपूरची निवड करण्याचा निर्णय अवघ्या पाच मिनिटात घेतला होता. आज या कार्यक्रमासाठी मुंबईहून येत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमान पुन्हा मुंबईला परतले. अखेर डॅसॉल्ट एव्हिएशनच्या फाल्कन विमानातून नागपूरला येण्याचा योग आला. आता याच विमानांची निर्मिती मिहानमध्ये पाच वर्षांत होईल. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील केदार, माजी आमदार रमेश बंग, उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रधान सचिव वलसा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रिलायन्स ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी आणि डॅसॉल्ट एव्हिएशनचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मेक इन इंडियांतर्गत प्रकल्प : अनिल अंबानी
अनिल अंबानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियांतर्गत मिहानमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांच्या सहभागाचा एव्हिएशन क्षेत्रातील पहिला प्रकल्प आहे. राफेल फायटर विमानासह विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती डॅसॉल्ट एव्हिएशनच्या संयुक्त भागीदारीतून सुरू होत आहे. प्रकल्प मिहानमध्ये सुरू व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा त्यांनी उल्लेख केला.
दोन देशांमध्ये सहकार्याचे
नवे दालन : फ्लोरेन्स पार्ली

फ्लोरेन्स पार्ली म्हणाल्या, भारत आणि फ्रान्स या लोकशाही असलेल्या देशांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात सहकार्याचे नवे दालन सुरू केले आहेत. एरोस्पेस क्षेत्रास नागपूरपासून सुरुवात होत आहे. या क्षेत्रातील अतिउच्च तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाला या उद्योगामुळे प्रारंभ होत आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीत हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
‘डॅसॉल्ट’चे योगदान महत्त्वपूर्ण : एरिक ट्रापियर
एरिक ट्रॅपियर म्हणाले, भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्सदरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण करारामुळे या क्षेत्राच्या विकासामध्ये डॅसॉल्ट एव्हिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एरोस्पेस उद्योगामुळे मिहानची ओळख जागतिक स्तरावर होणार आहे.
अंबानी कुटुंबीय उपस्थित
धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कच्या कोनशिला समारंभात अनिल अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, पत्नी टीना अंबानी आणि मुलगा अनमोल अंबानी प्रामुख्याने उपस्थित होते. समारंभानंतर कोकिळाबेन अंबानी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Introduction of 'Aerocracy' to Orange City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.