एम्प्रेस मॉलमध्ये अवैध बांधकाम
By admin | Published: August 28, 2015 03:23 AM2015-08-28T03:23:26+5:302015-08-28T03:23:26+5:30
मंजूर नकाशाच्या व्यतिरिक्त एम्प्रेस मॉलमध्ये ४५ हजार चौरस मीटर जागेत दोन अवैध इमारती उभारण्यात आल्या आहे.
पार्किंगच्या जागेत हॉटेल : ४५ हजार चौ.फुटाचे बांधकाम अनधिकृत
नागपूर : मंजूर नकाशाच्या व्यतिरिक्त एम्प्रेस मॉलमध्ये ४५ हजार चौरस मीटर जागेत दोन अवैध इमारती उभारण्यात आल्या आहे. बुधवारच्या अतिक्रमण कारवाईत थोडा भाग तोडण्यात आला. तूर्त अनधिकृ त बांधकाम हटविण्याची कारवाई थांबविण्यात आली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानतंरच ती केली जाणार आहे.
१९ आॅगस्टला मॉलवर हातोडा चालला होता. माल व्यवस्थापनाने स्वत: तीन दिवसात अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविल्याने कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. परंतु व्यवस्थापनाने अनधिकृत बांधकाम न हटविण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही न केल्याने धंतोली झोनच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी पुन्हा मॉलवर हातोडा चालविला. यात चौथ्या मजल्यावरील अवैध पार्किंगचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच २५ खोल्यांचे बांधकाम तोडण्यात आले.
तळमजल्यात मॉलच्या मागच्या भागात रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या गोदामाचे बांधकामही जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत चालली. कारवाईचा दंड म्हणून पथकाने दोन लाखाचे डिमांड मॉलला दिले. इमारतीच्या मंजूर नकाशा व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम के ल्याच्या तक्रारी मनपाकडे आल्या आहेत. त्यानुसार नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यास व्यवस्थापनाला सांगण्यात आले. परंतु दरवेळी कारण सांगून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे बुधवारी कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
गुरुवारी दंड भरलाच नाही
मॉल व्यवस्थापनाने नोटीस नंतरही अनधिकृत बांधकाम न काढल्याने बुधवारी अतिक्रमण पथकाने कारवाई केली. याचा दंड म्हणून पथकाने दोन लाखची डिमांड बजावली. व्यवस्थापनाने ही रक्कम गुरुवार पर्यंत झोन कार्यालयाकडे जमा करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी ती जमा केली नाही. प्रशासनाच्या आदेशालाही व्यवस्थापन जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
९० टक्के अवैध बांधकाम केव्हा पाडणार?
एम्प्रेस मॉलच्या मंजूर बांधकाम नकाच्या व्यतिरिक्त ४५ हजार चौ.फूट जागेत अवैध बांधकाम करण्यात आले आहे. तसेच पार्किंगसाठी असलेल्या जागेत हॉटेल सुरू केले आहे. याचा विचार करता अतिक्रमण पथकाने आजवर जेमतेम १० टक्केच अनधिकृत बांधकाम तोडले आहे. उर्वरित ९० टक्के नियमबाह्य बांधकाम केव्हा तोडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पार्किंगच्या जागेत हॉटेल
मॉलमधील गर्दी विचारात घेता पार्किंगची सुविधा असणे गरजेचे आहे. त्यानुसार नकाशात पार्किंगची जागा दर्शविण्यात आली. परंतु या जागेत पार्किंग सुरू न करता व्यवस्थापनाने हॉटेल उभारले आहे. अवैध हॉटलचे बांधकाम लवकरच हटविले जाणार असल्याची माहिती धंतोली झोनचे उपअभियंता अनिल कडू यांनी दिली.
वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा
एम्प्रेस मॉलमधील दोन अवैध इमारती उभारण्यात आल्या आहेत. तब्बल ४५ हजार चौ. फूट जागेत हे बांधकाम करण्यात आले आहे. बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अनधिकृत बांधकामाचा काही भाग हटविला. त्यानंतर गुरुवारी कारवाई सुरू राहील, अशी अपेक्षा होती. परंतु वरिष्ठांचे आदेश नसल्याने ही कारवाई तूर्त थांबविण्यात आली आहे. पथकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
चौकशीची गरज
एम्प्रेस मॉल मधील बांधकाम करताना नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाची चौकशी केल्यास ४५ हजार चौ.मीटरपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमानुसार बांधकाम नसल्याने येथील आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुदैवाने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे