ओव्हरलोड वाहनांकडून अवैध वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:23 AM2017-09-06T01:23:07+5:302017-09-06T01:23:31+5:30

क्षमतेपेक्षा जादा भार (ओव्हरलोड) घेऊन जाण्यासाठी शहरातील आरटीओ अधिकारी व कर्मचारी सात ते आठ हजार तर ग्रामीण भागात तीन हजार रुपये वसूल करीत असल्याचा आरोप ....

Invalid recovery by overloaded carrier | ओव्हरलोड वाहनांकडून अवैध वसुली

ओव्हरलोड वाहनांकडून अवैध वसुली

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ लोकल ट्रक एकता मंचचा आरोप : रेती, गिट्टी, मुरुम अंडरलोड करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षमतेपेक्षा जादा भार (ओव्हरलोड) घेऊन जाण्यासाठी शहरातील आरटीओ अधिकारी व कर्मचारी सात ते आठ हजार तर ग्रामीण भागात तीन हजार रुपये वसूल करीत असल्याचा आरोप विदर्भ लोकल ट्रक एकता मंचने करीत रेती, गिट्टी, मुरुम ‘अंडरलोड’ करण्याच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहरला सोमवारी दिले. तर याला उत्तर म्हणून कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी यासंदर्भातील तक्रारी थेट लाचलुचपत विभागाकडे करावी, असे आवाहन केले.
विदर्भ लोकल ट्रक एकता मंचच्यावतीने सर्व स्थानिक ट्रक मालकांनी‘ओव्हरलोड’च्या विरोधात निषेध व्यक्त करीत जड वाहनांमुळे रस्त्यांची होत असलेली दुर्दशा व खनिज संपत्तीची चोरी थांबविण्यासाठी आरटीओ शहर कार्यालयासमोर नारे-निदर्शने केली. निवेदनात म्हटले आहे की, सुमारे चार हजार ट्रक क्षमतपेक्षा जादा भार घेऊन धावतात. यातील एका ट्रककडून महिन्याकाठी १३ हजार रुपये जरी वसूल केले तरी पाच कोटी २० लाख रुपये होतात. हे थांबले नाही तर मंचच्यावतीने ओव्हरलोड वाहनांना पकडून आरटीओला स्वाधीन करण्याचे आंदोलन सुरू केले जाईल. निवेदनात वायू पथकाकडून अशी वाहने जप्त करून शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचाही कायदा लावण्याच्या मागणीसह सर्व रेतीघाटावर, धर्मकाट्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे व रॉयल्टीवर स्वाक्षरी करण्यासाठी शासकीय व्यक्तीची नियुक्ती करण्याची, वाहनांवर जीपीएस प्रणाली लावण्याची आदी मागण्याही करण्यात आल्या. निवेदन आरटीओ अधिकारी जिचकार यांच्यासह जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपजिल्हाधिकारी राव यांनाही देण्यात आले.
शिष्टमंडळात नितीन तिवारी, अक्रम शेख, समीर पठाण, कल्लू खान, किशोर पंचभाई, अतुल काटकर, नितीन राजाभोज, नितीन तिवारी, मेघराज मेश्राम, युनूस पठाण, मुन्ना मिश्रा आदींचा सहभाग होता.
२८३ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई
‘लोकमत’शी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार म्हणाले, विशेष मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कारवाईत आतापर्यंत २८३ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काहींवर फौजदारी कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेची गती आणखी वाढविण्यात येईल.

Web Title: Invalid recovery by overloaded carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.