अवैध नळ; गळतीमुळे पाण्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:42+5:302021-08-01T04:07:42+5:30
-नगरसेवक, नागरिकांची तक्रार : पाणीचोरीचे प्रकार वाढले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवैध नळजोडण्या व जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे ...
-नगरसेवक, नागरिकांची तक्रार : पाणीचोरीचे प्रकार वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध नळजोडण्या व जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे अनेक वस्त्यांत पाण्याची समस्या आहे. या संदर्भात नगरसेवक व नागरिकांनी मनपाच्या जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
काही भागांत जलकुंभांतून पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नाही, कुठे गळती तर कुठे नळजोडणी नसल्याने पाण्याची चोरी होत आहे. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
नगरसेवक आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी लक्षात घेता, सत्यता पडताळण्यासाठी गवई यांनी शहरातील विविध भागांचा दौरा केला. त्यांना कळमना परिसरात अनेक ठिकाणी गळती असल्याचे आढळून आले. अनेक वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
चंदननगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन असल्याचे आढळून आले. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. अवैध जोडण्या नियमित करण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. वाठोडा परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारी आहेत. त्यांनी समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. वाठोडा परिसरात जलकुंभ नसल्याने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. येथे जलकुंभ उभारण्याचे निर्देश गवई यांनी दिले.