आविष्कार! नदी स्वच्छ करणारा रोबोट ; नागपुरात रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 09:10 PM2018-02-15T21:10:08+5:302018-02-15T21:10:25+5:30

रमण विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या ‘रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल’मध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस विज्ञानाचे थक्क करून टाकणारे प्रयोग सादर केले आहेत.

Invention! River cleaner robot; Raman Innovation Festival in Nagpur | आविष्कार! नदी स्वच्छ करणारा रोबोट ; नागपुरात रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल

आविष्कार! नदी स्वच्छ करणारा रोबोट ; नागपुरात रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सादर केले नावीन्यपूर्ण प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नद्यांचे प्रदूषण वाढत चालले, अशा परिस्थितीत नदी स्वच्छ करणारा रोबोट असा शब्द कोणी उच्चारला तर नवल वाटेल. परंतु रमण विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या ‘रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल’मध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस विज्ञानाचे थक्क करून टाकणारे प्रयोग सादर केले आहेत. हे प्रयोग पाहण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे.
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या १४७ प्रयोगांपैकी निवडक ९८ प्रयोग प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, परमाणु खनिज अन्वेषण व अनुसंधान संचालनालयाचे माजी क्षेत्रिय संचालक अमित मजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी अभिमन्यू भेलावे, रमण विज्ञान केंद्राचे विलास चौधरी उपस्थित होते.

‘रिव्हर क्लिनिंग रोबोट’
प्रदर्शनात नारायण विद्यालयाचे वैभव वैद्य, अथर्व पशिने या विद्यार्थ्यांनी ‘रिव्हर क्लिनिंग रोबोट’ सादर केला आहे. यात एका बोटवर मोटर आणि समोरील दृष्य भागात जाळी टाकून मोटरच्या साह्याने जाळीवर येणारा नदीतील कचरा मागील भागात असलेल्या रिकाम्या टँकमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या तंत्राचा वापर नदी स्वच्छ करण्यासाठी केल्यास नद्यांमध्ये वाढत जाणारे प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे.

‘सेफ्टी डोअर फॉर रेल्वे’
रेल्वेगाडी आली की आत चढणारे आणि खाली उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. रेल्वेगाडी काही ठरावीक काळ प्लॅटफार्मवर थांबत असल्यामुळे प्रवाशांना त्यात चढणे-उतरणे शक्य होत नाही. अशावेळी रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निनाद पायघन, शंतनु मोहोड या विद्यार्थ्यांनी ‘सेफ्टी डोअर फॉर रेल्वे’ ही यंत्रणा प्रदर्शनात सादर केली आहे. यात संपूर्ण प्लॅटफार्मला एक फेंसिंग राहील. कोचच्या पोझिशननुसार फेंसिंगचे डोअर रेल्वे कोचच्या डोअरजवळ येतील. यात कंट्रोल रुममध्ये एक स्विच राहील. इंजिन जेथे लागते तेथे एक सेंसर राहणार असून त्यानुसार कोचचे डोअर उघडतील. प्रवासी आत बसल्यानंतर स्टेशन मास्तरने कंट्रोल रुममधील स्विच दाबल्यानंतर सर्व कोचचे डोअर बंद होतील. यात घाईगडबडीत बसताना प्रवाशांची जीवितहानी होणार नाही, ही या मागील मुख्य संकल्पना आहे.

हाऊस क्लिनिंग रोबोट
रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या अर्जुन शिंदे, अमन बुटोलिया या विद्यार्थ्यांनी ‘हाऊस क्लिनिंग रोबोट’ प्रदर्शनात सादर केला आहे. यात घरातील ओला आणि सुका कचरा साफ करण्याची सुविधा आहे. यात मायक्रो कंट्रोलर चीप, व्होल्टेज रेग्युलेटर, मोटर ड्रायव्हर मॉड्युलचा वापर करून हा रोबोट साकारण्यात आला आहे. घरातील नियमित साफसफाईसाठी हा रोबोट अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. हा रोबोट आॅटो आणि मॅन्युअल मोडवर वापरता येतो. घरी कुणी नसताना आॅटो मोडवर हा रोबोट केल्यास आपण घरी परत येईपर्यंत घराची स्वच्छता झालेली पाहावयास मिळेल. फक्त सात हजारापर्यंत हा रोबोट तयार होऊ शकत असल्याचे हा प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

‘स्मार्ट एनर्जी कंट्रोलिंग सिस्टिम’
वीज बिल न भरणारे आणि विजेची चोरी करणारे अनेक ग्राहक पाहावयास मिळतात. अनेक ग्राहक विजेचे कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांशी हुज्जतबाजी करतात. अशा स्थितीत केवळ महावितरणच्या कार्यालयातूनच वीज चोरी आणि विजेचा पुरवठा खंडित करणारा फॉर्म्युला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालायीत अक्षय आंबटकर, अनंता पाठक या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केला आहे. यात इथर्नेट मॉडेल आरडीनो सोबत कनेक्ट केले आहे. महावितरणच्या कार्यालयात कमांड दिल्यास विद्युत पुरवठा खंडित होतो आणि जर खंडित वीज पुरवठा केल्यानंतरही वायरची जुळवाजुळव करून विजेचा वापर करीत असल्यास लगेच महावितरणच्या कार्यालयात त्याची माहिती मिळते.

दिव्यांगांसाठी स्वयंचलित चेअर
दिव्यांग व्यक्तींना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. परंतु सेंटर पॉईंट स्कूल वर्धमाननगरच्या आर्यन कोठारी याने प्रदर्शनात सादर केलेली ‘व्हील चेअर आॅफ हँडीकॅप पीपल’ हा प्रयोग दिव्यांग व्यक्तींसाठी खरोखरच मोलाचा ठरणारा आहे. यात बॉलर बेअरींग, कॉपर प्लेट, स्क्रू, मोटर ड्रायव्हर, डाय डिओट्स, गिअर्ड मोटरचा वापर करून पुढे, मागे जाणारी, डावीकडे, उजवीकडे वळणारी चेअर साकारण्यात आली आहे. या चेअरमुळे दुसऱ्याचा आधार न घेता दिव्यांग व्यक्तींना हालचाल करणे सोईचे होणार आहे. अतिशय कमी खर्चात ही चेअर तयार होत असल्याची माहिती आर्यन कोठारी या विद्यार्थ्याने दिली.

Web Title: Invention! River cleaner robot; Raman Innovation Festival in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.