ओबीसींच्या बोगस जात प्रमाणपत्र वाटपाची एसआयटी मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
By कमलेश वानखेडे | Published: September 30, 2023 11:04 AM2023-09-30T11:04:20+5:302023-09-30T11:05:34+5:30
बरेच ओबीसी नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नागपूर : ओबीसींचे बोगस जात प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकऱ्या बळकावण्यात येत आहे. एकीकडे ओबीसींचे जात प्रमाणपत्र सरसकट वाटले जात आहे. गेल्या एक-दीड वर्षात अशी हजारो प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत, अशा सर्व प्रमाणपत्रांची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात केली.
वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे बोगस प्रमाणपत्र दिले जात आहे, तर दुसरीकडे ओबीसींनाच आंदोलन करण्यास सांगितले जात आहे. सगळी धूळ फेक सुरू आहे. लिखित स्वरूपात हमी दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे ओबीसी आंदोलन संघटनेचे नेते म्हणत होते. तर मग कालच्या बैठकीत असे काय झाले की त्यांनी लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असा सवाल करत बरेच ओबीसी नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपला निवडणूक जिंकणं सोपं नाही त्यामुळे मतांच्या धोबी करण्यासाठी वाद लावणे सुरू आहे. सरकारने नऊ वर्षे काही केले नाही. प्रभू श्रीराम ने कधीही माझं नाव घेऊन दुसऱ्याला मारा असे सांगितले नाही. पण निवडणुका तोंडावर असल्यामुळे असे उपज्ञा सुरू करण्यात आले आहे.
तर मुख्यमंत्री ही कंत्राटी नेमणार का ?
-कंत्राटी पदे भरण्याची तहसीलदारापासून केलेली सुरुवात उद्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये. नाहीतर पुढे सहा सहा महिने कंत्राटी पद्धतीने मुख्यमंत्री नेमावे लागतील. कंत्राट मॅनेज करणे व पंधरा ते वीस टक्के कमिशन घेणे, हा धंदा सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोग भाजपच्या खिशात
भाजपसोबत जो जाईल त्याला चिन्ह मिळेल अशी परिस्थिती आह. निवडणूक आयोग सध्या भाजपच्या खिशातच आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.