मुलाच्या मृत्यूची चौकशी करा

By Admin | Published: May 8, 2017 02:16 AM2017-05-08T02:16:32+5:302017-05-08T02:16:32+5:30

तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

Investigate the child's death | मुलाच्या मृत्यूची चौकशी करा

मुलाच्या मृत्यूची चौकशी करा

googlenewsNext

वडिलांची हायकोर्टाला विनंती :
पोलीस वाहनाने धडक दिल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
युवराज भय्याजी नासरे असे वडिलांचे नाव असून ते धन्वंतरीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अजिंक्य (१९) होते. तो रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. पोलीस वाहनाने धडक दिल्यामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्यात आल्याचा नासरे यांचा आरोप आहे. २८ जुलै २०१६ रोजी अजिंक्य नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाला होता. त्याच्याकडे मोटरसायकल होती. दरम्यान, जुना काटोल नाक्यावर अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. अजिंक्यने गाईला धडक दिली. त्यामुळे तो रस्ता दुभाजकावर आदळून ठार झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. परिणामी अजिंक्यविरुद्धच भादंविच्या कलम २७९ व ३३८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला.
परिस्थितीजन्य पुरावे व अजिंक्यच्या शरीरावरील जखमा पाहता त्याला वाहनाने धडक दिल्याचे स्पष्ट होते. ते वाहन पोलिसांचे होते, असा दावा नासरे यांनी केला आहे. अजिंक्यच्या हातावर वाहनाचे चाक गेल्याच्या खुणा होत्या. रोडच्या मधोमध त्याच्या रक्ताचे डाग होते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. नासरे जुलै-२०१६ पासून सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, त्यावर समाधानकारक कारवाई करण्यात आली नाही. नासरे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरणाचा विशेष यंत्रणेमार्फत तपास करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

पोलीस आयुक्तांना नोटीस
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन-२ व गिट्टीखदान पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून २१ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

 

Web Title: Investigate the child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.