मोवाड येथील विकासकामांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:14+5:302021-09-26T04:10:14+5:30
मोवाड : मोवाड नगरपरिषदेअंतर्गत काही शासकीय बांधकाम सुरू आहेत. ही कामे नियोजित आरखड्यानुसार होत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे ...
मोवाड : मोवाड नगरपरिषदेअंतर्गत काही शासकीय बांधकाम सुरू आहेत. ही कामे नियोजित आरखड्यानुसार होत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व स्थानिक नागरिकांनी केला आहे. गत काही महिन्यांपासून डपिंग यार्ड रस्ता, दोन प्राथमिक शाळांची सुरक्षा भिंत, वार्ड क्रमांक ३ मधील समाज मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली. लोकसत्ता शाळेच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम अंदाजे ५३ लाख रुपये, प्राथमिक पिवळी शाळेच्या सुरक्षा भिंतीचे काम २३ लाख रुपये, समाज मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी १७ लाख रुपये, तर डंपिंग यार्ड रस्त्यासाठी ३८ लाख रुपयांचा खर्च मंजूर आहे. ही सर्व कामे ही कंत्राटदाराने कमी दराने घेतली आहेत. त्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाची तक्रार जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, तसेच दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप बनाईत, योगेश क्षीरसागर, धर्मेंद्र मुसळे, नंदकिशोर मानेकर, विशाला चरपे, नाना बनाईत, शंकरराव खोकले, नंदकिशोर क्षीरसागर, प्रशांत खोकले, युवराज बांदरे यांचा समावेश होता.
--
शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाची पाहणी केली असता कामात काही तांत्रिक चुका आढळून आल्या. त्यानुसार कंत्राटदाराला देयक अदा करण्यात येईल. यानंतर अशा चुका होणार नाही याबाबत या कंत्राटदारास आवश्यक तांत्रिक निर्देश दिलेले आहेत.
अनिल देशमुख, नगरआभियंता, नगर परिषद, मोवाड.