महावितरणमधील ३० हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:21 IST2020-02-18T00:21:02+5:302020-02-18T00:21:59+5:30
वीज वितरण कंपनीतील ३० हजार कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली.

महावितरणमधील ३० हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज वितरण कंपनीतील ३० हजार कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली.
वीज दर निम्मे करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाच्या जनजागरण अभियानाची सुरुवात विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक इतवारी येथून करण्यात आली. त्यावेळी समितीचे संयोजक राम नेवले यांनी जनजागृतीसाठी छोटेखानी इलेक्ट्रॉनिक्स रिक्षाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी ते म्हणाले, वीज कंपनीतील हा घोटाळा वीज नियामक आयोगानेच उघडकीस आणला आहे. इतका मोठा घोटाळा होत असताना महावितरण कंपनीला ५३ हजार कोटीचा तोटा कसा काय होतो, असा प्रश्न उपस्थित करीत विदर्भातील नागरिकांनी या घोटाळ्याचा पैसा भरून निघत नाही तोपर्यंत वीज बिल भरू नये, असे आवाहन केले. याप्रसंगी मुकेश मासूरकर, विष्णूजी आष्टीकर, गणेश शर्मा, गुलाबराव धांडे, अनिल केशरवानी, अण्णाजी राजेधर, रवींद्र भामोडे, नंदूभाऊ पेरकर, विजय मौंदेकर, रामेश्वर मोहबे, प्यारुभाई नौशाद अली, राजेश बंडे उपस्थित होते.