सीसीटीव्ही फुटेजपासून तपास
By admin | Published: January 10, 2016 03:29 AM2016-01-10T03:29:17+5:302016-01-10T03:29:17+5:30
मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीत राहणारा चैतन्य नेहमीप्रमाणे मोन्टफोर्ट स्कूलच्या बसमधून दुपारी २.४० ला बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ उतरला.
नागपूर : मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीत राहणारा चैतन्य नेहमीप्रमाणे मोन्टफोर्ट स्कूलच्या बसमधून दुपारी २.४० ला बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ उतरला. गौरव ढोमणे नामक मित्रासह तो त्याच्या घराजवळ आला असताना अचानक सिल्व्हर कलरची मारुती ईको कार आली आणि त्यातील एका आरोपीने चैतन्यला कारमध्ये कोंबले.
दुसऱ्या क्षणाला अपहरणकर्ते पसार झाले. चैतन्यचे अपहरण झाल्याचे गौरवने आपल्या आईला सांगताच ही माहिती चैतन्यची आई सुनंदा, वडील सुभाष आणि त्यानंतर सोनेगाव पोलिसांना कळविण्यात आली. चैतन्यचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच शहर पोलीस दल चैतन्य आणि त्याच्या अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी धावपळ करू लागले. गौरवच्या सांगण्यावरून एका आरोपीचे स्केच काढण्यात आले. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या अपहरणकर्त्यांच्या कारचे चित्र मिळवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, सीसीटीव्हीत कारचा क्रमांक आला नसल्याने आणि अपहरणकर्त्यांकडून खंडणी मागणारा कसलाही फोन न आल्यामुळे तब्बल २१ तास या अपहरणकांडात पोलीस अंधारात चाचपडत होते. मात्र, अखेर शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पोलिसांनी अपहरणकर्त्यांना शोधून त्यांच्या तावडीतून चैतन्यची सुटका करण्यात यश मिळवले.
तंत्रज्ञानाचा वापर
अपहरणकर्त्याने ज्या नंबरवरून फोन केला ते सीम भलत्याच व्यक्तीच्या नावे असल्याने (बनावट नावाने सीम मिळवून) पोलीस काही वेळेसाठी घुटमळले; नंतर मात्र मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. धमकी देणारा आरोपी खापा-बडेगाव परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या कालावधीत नागपुरातील सिल्व्हर कलरच्या १२०० मारुती ईको व्हॅनची पोलिसांनी माहिती मिळविली. त्यातील तीन कारधारक खापा येथे राहतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कारमालकाला शोधून पोलिसांनी चौकशी केली. एका कारमालकाने आपली कार गुरुवारी नागपूरला भाड्याने गेली होती, असे सांगून कार नेणाऱ्याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने ईशाकने १५०० रुपये देऊन कार मागितल्याची माहिती दिली. पोलिसांनी ईशाकचे घर शोधले, मात्र तो घरी नव्हता. ज्या फोनमध्ये दुसऱ्याचे सीमकार्ड टाकून वापरले तो मोबाईल फोन ईशाकच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या अपहरणात ईशाक असल्याचा पोलिसांचा संशय घट्ट झाला. त्यांनी ईशाकचा शोध घेण्यासाठी या भागात नाकाबंदी लावली. वाहनांची झडती घेण्यात येत होती. त्याच्या मित्रांकडेही विचारणा केली जात होती. तब्बल १२ तपास पथके ईशाकला शोधू लागली. या भागातील सर्व मार्गांवर पोलीस दबा धरून बसले. रात्री १०.३० च्या दरम्यान बडेगाव जंगलातून मोटरसायकल येत असल्याचे दिसताच पोलीस सतर्क झाले. मोटरसायकल ईशाक चालवत होता अन् मागे चैतन्य बसला होता. ईशाकने स्वत:ची अन् चैतन्यची ओळख देतानाच आपण त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन सोडण्यासाठी निघाल्याचे म्हटले. त्याचवेळी पोलिसांनी त्याची मानगूट पकडून चैतन्यला जवळ घेतले.