ग्वालबन्सीची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी
By admin | Published: April 28, 2017 02:55 AM2017-04-28T02:55:50+5:302017-04-28T02:55:50+5:30
अवैध सावकारी करून गोरगरीब आणि गरजू व्यक्तींच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावणारा कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी,
अनेकांची होणार चौकशी : साथीदारांचे धाबे दणाणले
नागपूर : अवैध सावकारी करून गोरगरीब आणि गरजू व्यक्तींच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावणारा कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, त्याच्या पापात सहभागी असलेले त्याचे नातेवाईक आणि साथीदारांची चौकशी करण्यासाठी आज पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश कलासागर यांच्या नेतृत्वातील या तपास पथकात सहायक पोलीस आयुक्त, दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भूमाफियाचे पाप खोदून काढण्यासाठी एसआयटी नेमण्याची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे. ही एसआयटी भूमाफियाच्या टोळीशी जुळलेल्या अनेकांची चौकशी करणार असल्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
कुख्यात ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंड साथीदारांनी शेकडो गरजूंच्या जमिनी हडपून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. भूपेश सोनटक्के नामक अभियंत्याची अशाच प्रकारे त्याने जमीन हडपल्यामुळे भूपेशने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. लोकमतने त्यावेळी या अकस्मात मृत्यू प्रकरणात वेगळेच काही असल्याचे प्रकाशित करून पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे गेल्या आठवड्यात मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यानंतर रुखमाई गजानन वैद्य (वय ६०, रा. सावता मंदिरजवळ, कळमेश्वर) या वृद्धेने नोंदविलेल्या तक्रारीवरून मानकापूर ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी ग्वालबन्सीच्या मुसक्या बांधल्यानंतर अनेक तक्रारकर्ते
पुढे आले. त्यामुळे मंगळवारी रात्री एकाच दिवशी पोलिसांनी फसवणूक, धमकी अन् अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी तीन गुन्हे आणि कोराडी ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल झाले. तक्रारकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ग्वालबन्सीविरुद्ध तक्रारी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. ते लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल आणि स्वतंत्र तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी एसआयटीची नियुक्ती केली. तसा आदेश सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी काढला.
पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न
भूमाफिया ग्वालबन्सीच्या पापाचा धडा वाचण्यासाठी अनेकजण पुढे येत आहे. त्यामुळे ग्वालबन्सी टोळीशी जुळलेले दुसरे भूमाफिया, पाठीराखे एकत्र आले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी या पाठीराख्यांनी एक बैठक घेऊन पोलिसांवर दडपण कसे आणायचे, त्याबद्दल कटकारस्थान रचले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, ग्वालबन्सीच्या पापात सहभागी झाल्यास पोलिसांकडून आपल्यावरही कारवाई होऊ शकते, हे ध्यानात आल्यामुळे अनेकांनी मोर्चात येण्यास नकार दिल्याचे समजते.
सात वर्षांत ८० एकर जमीन
आतापर्यंतच्या चौकशीत भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीने २००१ ते २००७ या सात वर्षांत ८० एकर जमीन जमविली. ही जमीन त्याने कशी काय मिळविली, कोणते उद्योग चालवून जमीन विकत घेतली, असा पोलिसांनी त्याला प्रश्न विचारला असता, त्याने हेरफेर करून जमीन बळकावल्याचे सांगितल्याचेही समजते. बरीचशी जमीन त्याच्या पत्नीच्या नावे मोर्शी, खैरी या भागातही असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अप्पूची धावाधाव
भूमाफिया ग्वालबन्सीच्या पापाचा भागीदार असलेल्या कुख्यात अप्पूने प्रारंभीपासून ग्वालबन्सीला वाचविण्यासाठी धावपळ चालवली आहे. त्याचा बचाव करतानाच पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न अप्पू करीत असून, पडद्यामागची सर्व सूत्रे तो हलवीत आहे. अन्य एक भूमाफिया त्याला साथ देत आहे. अप्पूच्या पापाची जंत्री खुद्द भूमाफियानेच वाचल्यामुळे आता अप्पूची धावपळ वाढली आहे. तो दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत असले तरी, तो नागपुरातच एका मित्राच्या घरी दडून असल्याची माहिती आहे.
पोलिसांचे अभिनंदन
सहायक पोलीस उपनिरीक्षकासह २५ पोलीस कर्मचाऱ्यांचे भूखंड बळकावणाऱ्या भूमाफिया ग्वालबन्सीविरुद्ध पहिल्यांदाच शहर पोलिसांनी कारवाई करण्याचे धाडस दाखविले आहे. त्यामुळे शहर पोलिसांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक नागरिकांनी गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालय गाठले. आयुक्तांच्यावतीने प्रॉपर्टी सेलचे निरीक्षक वजीर शेख यांनी या नागरिकांना आश्वस्त केले.
दिलीप ग्वालबन्सीविरुद्ध आणखी एक गुन्हा
स्वत:च्या भूखंडावर जाण्यास मज्जाव करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पीडिताने दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंड साथीदारांविरुद्ध गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. रमेश मुरारी काटरपवार असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते गणपतीनगर गोधनी येथे राहतात. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हजारीपहाड भागात त्यांचा एक भूखंड आहे. या भूखंडावर ते आज सायंकाळी आपल्या साथीदारांसह जात होते. त्यावेळी तेथे असलेल्या गुंडानी काटरपवार यांना भूखंडावर जाण्यास मज्जाव केला. ही जमिन दिलीप ग्वालबन्सीने विकत घेतली असल्याचे आरोपी सांगू लागले. हे भूखंड माझा आहे, असे म्हटले असता गुंडांनी येथे आल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. दिलीपभाऊ जेलमध्ये आहे म्हणून काय झाले, आम्ही तुला येथे आल्यास सोडणार नाही, अशी धमकीही दिली.