तब्बल १०० सीसीटीव्हींतून तपास, दागिनेचोर महिलेला अखेर अटक

By योगेश पांडे | Published: September 8, 2023 02:20 PM2023-09-08T14:20:58+5:302023-09-08T14:21:21+5:30

मागील आठवड्यात ऑटोतून चोरले होते दागिने

Investigation through around 100 CCTVs, woman thief finally arrested | तब्बल १०० सीसीटीव्हींतून तपास, दागिनेचोर महिलेला अखेर अटक

तब्बल १०० सीसीटीव्हींतून तपास, दागिनेचोर महिलेला अखेर अटक

googlenewsNext

नागपूर : ऑटोतून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील दागिने चोरी गेल्यानंतर पोलिसांनी चोराला शोधण्यासाठी तब्बल शंभर सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून तपास केला आणि आरोपी महिलेला अखेर हुडकून काढले. पावणेतीन लाखांच्या दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांना आठवड्याभरात यश आले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

उर्मिला अशोक भुजबळे (४९, आर्वीनाका, वर्धा) यांच्याकडे त्यांच्या वहिनीचे दागिने होते. ते देण्यासाठी त्या २९ ऑगस्ट रोजी वर्धा येथून आल्या होत्या. अगोदर त्या कोराडी येथे नातेवाईकांकडे थांबल्या. त्यानंतर मेट्रोने छत्रपती चौकात आल्या. तेथून त्यांनी म्हाळगी नगरला जाण्यासाठी ऑटो केला. ऑटोत त्यांच्या शेजारी एक महिलादेखील येऊन बसली. मानेवाडा चौकात ती महिला उतरली. त्यानंतर ऑटोचे पैसे देण्यासाठी उर्मिला यांनी पर्स उघडली असता त्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पोत व पाच ग्रॅमची अंगठी असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल गायब होता.

उर्मिला यांनी लगेच हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पोलिसांनी संबंधित परिसरासह विविध भागांतील सार्वजनिक जागांवरील, लोकांच्या घरातील व दुकानातील सीसीटीव्ही तपासले. सुमारे शंभर कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना यात सविता सोपराज शेंडे (४०, विवेकानंद नगर, कन्हान) हिचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.

खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तिचा पत्ता काढण्यात आला. तिला ताब्यात घेऊन विचारणा केली असता तिने गुन्हा केल्याचे कबुल केले. तिच्या ताब्यातून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिने या प्रकारे आणखी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत, विक्रांत सगणे, महेश पांडे, नृसिंह दमाहे, शैलेश ठवरे, राजेश धोपटे, आशीष तितरमारे, गणेश बोंदरे, चंद्रशेखर कौरती, मुकेश कन्नाके, पवन लांबट, अमृता यादव, सायबर सेलचे दिपक तऱ्हेकर, कुणाल उके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Investigation through around 100 CCTVs, woman thief finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.