‘वेकोलि’ करणार साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: October 27, 2015 03:56 AM2015-10-27T03:56:48+5:302015-10-27T03:56:48+5:30
डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत
नागपूर : डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
‘वेकोलि’च्या नागपूर मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सोमवारी गोयल यांनी संबोधित केले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘वेकोलि’चे ‘सीएमडी’ राजीव रंजन मिश्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेकोलि’तर्फे २४ महिन्यांत २४ खाणी उघडण्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० महिन्यांत १० नवीन खाणी उघडण्यात यश आले आहे. २०१९-२० पर्यंत ‘वेकोलि’कडून नवीन खाणी उघडणे तसेच जुन्या खाणींच्या देखभालीसाठी ६ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
‘वेकोलि’ने या वर्षी ४५ मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे असे गोयल यांनी सांगितले. देशात सत्ताबदल झाल्यापासून ‘कोल इंडिया’नेदेखील प्रगती केली असून गेल्या वर्षभरात ३२ मिलियन टन कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले. यंदाच्या वर्षी एकूण ५५० मिलियन टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट असून पहिल्या सहा महिन्यांतच ९ टक्के वाढ दिसून आली आहे. ‘कोल इंडिया’ नक्कीच उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातदेखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. ५० टक्के वायूआधारित ऊर्जाप्रकल्प परत सुरू झाले आहे. याशिवाय दाभोळ ऊर्जाप्रकल्प सुरू करण्याचे केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेदेखील प्रतिपादन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
वर्षभरात १५ कोटी
‘एलईडी’ बल्ब देणार
ऊर्जा मंत्रालयातर्फे देशभरात स्वस्त दरात ‘एलईडी’ बल्ब उपलब्ध करून देण्यात येत आहे. ३१० रुपयांचा बल्ब ९० ते १०० रुपयांना ग्राहकांना देण्यात येत आहे. आतापर्यंत २ कोटी १४ लाख ‘एलईडी’ बल्ब विकण्यात आले असून येत्या वर्षभरात १५ कोटी बल्ब ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
नोव्हेंबरपासून ‘इको’ पर्यटन
पर्यटन आणि पर्यावरण यांना एकत्र जोडण्यासाठी ‘इको’ पर्यटनाची संकल्पना पीयूष गोयल यांनी मांडली. सावनेरमध्ये मार्च महिन्यात वेकोलिच्या ‘इको पार्क’चे भूमिपूजन करण्यात आले होते. याची सुरुवात नोव्हेंबरपासून होईल व यात झीरो माईल, आदासा मंदिर, सावनेर खाण, इको पार्क, गोंडेगाव खाण यांचा समावेश असेल. विद्यार्थी व नागरिकांना याअंतर्गत प्रत्यक्ष खाणीचे कार्य, ऊर्जा प्रकल्प पाहण्याची संधी मिळेल. देशभरातदेखील अशा प्रकारे ‘इको पार्क’ उभारण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.