Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 02:04 PM2022-03-21T14:04:21+5:302022-03-21T14:17:11+5:30
Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत.
जगदीश जोशी
नागपूर : क्रिप्टो करन्सी (डिजिटल करन्सी)च्या नावाने खूप फायदा मिळवून देण्याची बतावणी करून नागरिकांची १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम उडविल्याची माहिती आहे. फसवणुकीतून मिळालेल्या या रकमेतून आरोपींनी ऐशो आरामाचे जीवन व्यतित केले. गुंतवणूक केलेल्या रकमेबाबत सांगू शकत नसल्यामुळे अनेक पीडित तक्रार न देताच परतले. आरोपींची सत्यता बाहेर आल्यानंतर पोलीसही आता क्रिप्टो करन्सीच्या फसवणुकीतील आरोपींचा बंदोबस्त करण्याच्या मागे लागले आहेत.
आर्थिक शाखेने १९ फेब्रुवारीला निषेद वासनिक व त्याची पत्नी प्रगतीसह ११ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, लक्झरी कार, दागिन्यांसह १.२५ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत.
निषेद हा पत्नी तसेच साथीदारांसह फरार होता. दरम्यान, त्याने नागपूरला येऊन आपल्याच एका साथीदाराचे अपहरण करून खूनही केला होता. निषेद पत्नीसोबत पुण्याच्या लोणावळामध्ये ऐशो आरामाचे जीवन जगत होता. तो महागडे हॉटेल आणि पेंट हाऊसमध्ये राहत होता. मुंबईच्या महागड्या मॉडेल्सवर लाखो रुपये उधळत होता. आठवडा, दोन आठवड्यांसाठी महागडे पेंट हाऊस किरायाने घेतल्यामुळे पोलिसांची त्याच्यावर नजर गेली होती. पीडितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निषेद टोळीने ८० ते ९० कोटींची फसवणूक केल्याची माहिती आहे. परंतु गुंतवणूक केलेल्या रकमेचा स्रोत सांगू शकत नसल्यामुळे अनेक पीडितांनी तक्रार दाखल केलेली नाही.
निषेदच्या धर्तीवर क्रिप्टो करन्सी किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध २ मार्चला पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅकेटचे सूत्रधार अशोक लांडे, मंगल तिवारी, त्यांचे साथीदार धर्मेंद्र पटेल तसेच रोहन राठोडला अटक करण्यात आली आहे. पटेल गुजरातचा, तर इतर तिघे स्थानिक आहेत. लांडे-तिवारी जवळपास पाच वर्षांपासून गुंतवणुकीची बतावणी करून फसवणूक करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध २०१९ मध्येही एक गुन्हा दाखल केला होता. एका प्रकरणात त्याने आपणच पीडित असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. निषेद वासनिकच्या चौकशीत याचा खुलासा झाला होता.
गुंतवणूकदारांची चूकच जबाबदार
फसवणुकीच्या तीनही घटनांत पीडितांची चूकच मोठे कारण आहे. क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या अधिकृत ॲप आणि साईट्स आहेत. त्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे सोडून पीडित नागरिक आरोपींच्या जाळ्यात अडकले. निषेद आणि इतर दोघांची टोळी अनेक दिवसांपासून फसवणूक करीत आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. तरीसुद्धा गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली.
विदेशात नेतात पर्यटनासाठी
गुन्हेगार आकर्षक युवती आणि आलिशान हॉटेलमध्ये सेमिनारचे आयोजन करतात. गुंतवणूकदारांना समूहाने दुबई, सिंगापूर, थायलंडसारख्या देशात पर्यटनासाठी नेतात. निषेदही याच पद्धतीने काम करीत होता. यामुळे क्रिप्टो करन्सीचे सेमिनार आयोजित करणाऱ्या हॉटेलचा बंदोबस्त करण्याचा विचार पोलीस करीत आहेत. नागरिकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी सत्य जाणून घ्यावे, तसेच पोलिसांना सूचना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.