काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:18+5:302021-02-26T04:11:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक-किट्स काॅलेज- हिवरा (हिवरी) हा मार्ग सहा किमीचा असून, या मार्गाच्या दाेन्ही बाजूंना माेठ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेक-किट्स काॅलेज- हिवरा (हिवरी) हा मार्ग सहा किमीचा असून, या मार्गाच्या दाेन्ही बाजूंना माेठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. ती रस्त्याच्या दिशेने झुकली असून, या मार्गावर खड्डेही तयार झाले आहेत. ही झुडपे व खड्डे अपघातांना निमंत्रण देत असल्याने त्यांची साफसफाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
हा मार्ग रामटेक शहराला जाेडणारा असल्याने तसेच या मार्गालगत किट्स काॅलेज असल्याने या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. किट्स काॅलेज ते हिवरा (हिवरी) दरम्यानच्या तीन किमी अंतरात झुडपे व खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. शिवाय, झुडपांमुळे वळणांवर विरुद्ध दिशेने येणारी वाहने व्यवस्थित दिसतदेखील नाहीत. त्यामुळे ही बाब अपघातांना कारणीभूत ठरते.
हा मार्ग अरुंद असल्याने विरुद्ध दिशेने माेठे वाहन आल्यास दुचाकी, तीनचाकी व छाेटी चारचाकी वाहने रस्त्याच्या खाली उतरावी लागतात. काटेरी झुडपांमुळे दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागताे. रात्रीच्या वेळी ही समस्या आणखी गंभीर हाेते. हा मार्ग जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येताे. या विभागातील सहायक अभियंत्याचे पद रिक्त आहे. शिवाय, शासनाकडून निधी प्राप्त हाेत नसल्याने रस्ता दुरुस्ती व साफसफाईची कामे रखडली असल्याची माहिती या विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
या मार्गाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून नागपूर कार्यालयात पाठविण्यात आले आहे. मात्र, त्याला प्रशासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही, असेही या विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, या मार्गावरील वाढते अपघात थांबविण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी तसेच रस्त्यालगतची काटेरी व साधी झुडपे ताेडून हा मार्ग साफ करावा, अशी मागणी हिवरा (हिवरी) येथील जयदेव डडोरे, अण्णा चाफले, कमलाकर हिंगे यांच्यासह अन्य गावांमधील नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.