बडोद्यातील साहित्य संमेलनातील निमंत्रितांना मानधन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:18 PM2018-01-29T21:18:09+5:302018-01-29T21:19:28+5:30
यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले. त्यांच्या आवाहनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही दुजोरा दिला. परंतु आयोजकांच्या या आवाहनाला साहित्य विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, मानधन हा साहित्यिकांचा सन्मान आहे, आयोजक तो कसा नाकारू शकतात. क्षमता नसेल तर हा शिवधनुष्य हातात घेतला कशाला, असा प्रश्न साहित्य विश्वातून विचारला जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेत १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथे होणार आहे. संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी व दिलीप खोपकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यातील संस्थानिकांनी मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भरपूर काम केले आहे. त्यामुळे संमेलनाच्या परिसराला ‘ महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी ’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांच्याहस्ते होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री चुडासमा उपस्थित राहणार आहे.
संमेलनात एकाच परिसरातील विविध स्थळांवर चार परिसंवाद, कविसंमेलन, मान्यवरांचे काव्यवाचन, बोलीतील कविता, स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन, प्रतिभावंतांचा सहवास, कथा-कथाकार, कथानुभव, टॉक-शो, या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषेचे वैभव व गौरवाचे दर्शन घडविणारा मराठी भाषा सुंदरी हा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संगीत पहाट, शास्त्रीय गायन आदी कार्यक्रम होणार आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे सांगितिक दर्शन, बडोद्याच्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेले बडोदा कला वैभव सोबतच कविकट्टा, प्रकाशन मंच, प्रकाशकांचा मेळावा होणार आहे.
बडेजाव करण्यापेक्षा गुणात्मक संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतलेल्या भूमिकेनुसार निमंत्रकांचे मानधन, प्रवासभत्ता यावरचा खर्च कमी केला आहे. संमेलनात फार असा बडेजाव केलेला नाही. संमेलन गुणात्मक कसे होईल, यावर आयोजकांचा भर आहे.