अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्याने राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 08:32 PM2019-07-09T20:32:43+5:302019-07-09T20:36:45+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच्या विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याचा विरोध केला. काही संघटनांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच्या विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याचा विरोध केला. काही संघटनांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.
विद्यापीठाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिष्ट्वटरवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाच्या बीए भाग-२ च्या इतिहासाच्या पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माण कार्यात भूमिका हे शिकविताना, आरएसएसने १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा विरोध केला होता, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचा विरोध केला होता, हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, स्वातंत्र्य संग्रामात गद्दारी केली, ज्यांच्या विचारामुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्यांचा इतिहास आता शिकविला जाणार आहे. राजकीय पटलावर या विषयावर चर्चा प्रतिक्रिया उमटत असताना विद्यापीठाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी स्पष्ट केले की, यात कुठलेही राजकारण नाही. एमए इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात शिकविले जात आहे. एमएच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये आधुनिक विदर्भाचा इतिहास या पेपरच्या चौथ्या युनिटमध्ये संघाचा मुद्दा आहे. पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चुप्पी साधली आहे.
असे आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मंजुरी दिली होती. अभ्यासक्रमात कम्युनॅलिझमचा उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन यांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र अभ्यासक्रमात बदल करताना कम्युनॅलिझमच्या बदल्यात देशाच्या निर्माणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान या विषयाचा समावेश करण्यात आला. संपूर्ण अभ्यासक्रमातून कम्युनॅलिझमचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.
अन्य संघटनांनीही केला विरोध
राजकीय पक्षासोबतच स्थानिक संघटनांनीसुद्धा विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला. यासंदर्भात मंगळवारी शिवाजी विद्यार्थी संघाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांना निवेदन देऊन अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषय काढण्याची मागणी केली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वातसुद्धा निवेदन देण्यात आले. अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न वगळ्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी या प्रकरणी कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
अन्य संघटनांनीही केला विरोध
राजकीय पक्षासोबतच स्थानिक संघटनांनीसुद्धा विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला. यासंदर्भात मंगळवारी शिवाजी विद्यार्थी संघाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांना निवेदन देऊन अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषय काढण्याची मागणी केली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वातसुद्धा निवेदन देण्यात आले. अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न वगळ्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी या प्रकरणी कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.