रेशन दुकानात मिळणार आता आयोडिनयुक्त मीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:57 AM2018-08-06T10:57:00+5:302018-08-06T10:58:56+5:30
गरीब कुटुंबात आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकारी रेशन दुकानामध्ये आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब कुटुंबात आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकारी रेशन दुकानामध्ये आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जुलै महिन्यापासून कार्डधारकांना आयोडिनयुक्त मीठ बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात सुरुवात झाली आहे. शरीरात आयोडिनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने हे पाऊल उचलले आहे. आयोडिनयुक्त मीठ हे साधारण मिठापेक्षा महाग आहे. गरीब परिवार महाग असलेले मीठ खरेदी करीत नाहीत. राज्यात ७० टक्के नागरिक आयोडिनयुक्त मिठाचे सेवन करतात. आयोडिनची शरीराला आवश्यकता असल्याचे अज्ञान असल्याने आजही ३० टक्के लोक साधारण मिठाचे सेवन करतात.
का आहे आयोडिनची आवश्यकता?
मानवी शरीराला आयोडिनची नियमित आवश्यकता असते. आयोडिनच्या कमतरतेमुळे मुलांचा बौद्धिक विकास खुंटतो, महिलांना गलगंड व शारीरिक वृद्धी खुंटते. त्याचबरोबर आयोडिनच्या कमतरतेमुळे गर्भातील शिशूवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. महिलांमध्ये वेळेपूर्वी प्रसूतीची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी दररोज २०० मायक्रोग्रॅम तसेच ६ ते १२ वर्षांच्या मुलांनी १२० मायक्रोग्रॅम, १२ ते अधिक वयाच्या मुलांनी १५० मायक्रोग्रॅम आयोडिन सेवन करण्याची आवश्यकता आहे. आयोडिन मिठामुळे आपण ही कमतरता भरून काढू शकतो.
तूर डाळ ३५ रुपये किलो
गेल्या वर्षी राज्यात तुरीचे बम्पर उत्पादन झाले होते. त्यामुळे रेशन दुकानात तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मे महिन्यात ५५ रुपये किलो तूर डाळ उपलब्ध केली. परंतु बाजारातील किंमत व रेशन दुकानातील किमतीत जास्त अंतर नसल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारने ३५ रुपये किलो तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न पुरवठा विभागातून मिळाली आहे.