आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:58 AM2018-05-30T09:58:42+5:302018-05-30T09:58:52+5:30

देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले.

The IPL has broken down Bookies | आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

Next
ठळक मुद्देअनेकांचे डाव फसलेकोट्यवधींचा फटकामध्य भारतातील बुकी बाजार गारद

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले. नागपूर-विदर्भातील बहुतांश बुकींचे पहिल्यांदाच क्रिकेटच्या सामन्यात डाव उलटे पडले. परिणामी अनेकांना कोट्यवधींचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या फिक्सरला या सीझनमध्ये दीडशे कोटींचा फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. बहुतांश बुकी कोट्यवधींची रक्कम हरल्यामुळे मध्य भारतातील सट्टाबाजार गारद झाल्याची माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.
आयपीएल टी-२० क्रिकेटच्या रणसंग्रामाची सांगता रविवारी २७ मे रोजी झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि खासकरून आयपीएलचे सीझन म्हणजे देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजले जाते. रोज कोट्यवधींची उलाढाल अन् लाखोंची कमाई होत असल्याने बुकी मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची खास तयारी करून ठेवतात. जागोजागी हायटेक अड्डे तयार करून क्रिकेट बेटिंगची व्यवस्था करतात. ठिकठिकाणच्या पंटर्सना लाईन देतात.
विशेष म्हणजे, नागपूरचे बुकी देश-विदेशात चर्चेला आहेत. कारण चार वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या मॅच फिक्सिंगमध्ये श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मॅच फिक्स करणाऱ्यांमध्ये नागपूरचे बुकी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली होती. त्यानंतर उपराजधानीतील सट्टाबाजार देश-विदेशातील बुकींचे ‘हॉट मार्केट’ असल्याचे आणि येथील बुकी केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील क्रिकेटचा सट्टाबाजार संचालित करीत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या अकराव्या क्रिकेट संग्रामाची तयारी झाली होती. स्थानिक बुकींनी विविध ठिकाणी लाईन देऊन ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी यावर्षी नागपूरात नव्हे तर भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडली होती. तेथून ते मध्य भारतातील क्रिकेट सट्ट्याचा कारभार संचालित करीत होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, इंदूर, भोपाळ, रायपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धासह थेट गोवा, दुबई आणि बँकॉकमध्ये बसलेल्या बुकींच्याही स्थानिक बुकी निरंतर संपर्कात होते.
पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीपासून नंतरच्या प्रत्येक घडामोडीवर बुकींनी खयवाडी लगवाडी केली होती. पहिल्या २० सामन्यांपर्यंतची स्थिती स्थानिक बुकींसाठी ठिकठाक होती. नंतर मात्र बुकींची अवस्था पिटल्यासारखीच झाली. संबंधित वर्तुळाच्या माहितीनुसार, ६० पैकी ४५ सामन्यांमध्ये डाव उलटे पडल्याने बहुतांश बुकी गारद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या रिंकूला दीडशे कोटींचा फटका बसला. राज, सोनू कामठीचेही कंबरडे मोडले. रम्यासह भंडारा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि ठिकठिकाणी अड्डे संचालित करणाऱ्या बुकींची कोट्यवधींची हार झाल्याने दाणादाण उडाली.

५० टक्के फायनलपूर्वीच आऊट
४रविवारी आयपीएलची सांगता झाली. खरेतर फायनलचा सामना बुकीबाजारात सर्वाधिक उलाढालीचा सामना असतो. मात्र, कधी नव्हे एवढी मोठी रक्कम हरल्यामुळे अनेक बुकी हतबल झाले. त्यामुळे रविवारी फायनलच्या सामन्याच्या वेळी मध्यभारतातील सुमारे ५० टक्के बुकी बेटिंगसाठी बसलेच नाहीत. प्रत्यक्ष खयवाडीऐवजी इकडून तिकडे कटिंग करणाऱ्या बुकींनीच फायनलची खयवाडी केली. गेल्या दहा वर्षांत नागपूर-विदर्भातील बुकींना एवढे मोठे नुकसान कधीच सहन करावे लागले नाही, असे एका संबंधिताने लोकमतला सांगितले.

Web Title: The IPL has broken down Bookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.