एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आयपीपीबीचे १२१ कोटींचे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:36 PM2020-10-09T23:36:11+5:302020-10-09T23:38:17+5:30
IPPB transactions, Nagpur news कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली. नागपूर विभागात आतापर्यंत आयपीपीबीची साडेसात लाख बँक खाती उघडल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ उत्सवाचे आयोजन नागपूर क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. यावेळी जायभाये यांनी विभागाच्या प्रगतीची माहिती दिली. पोस्टल जीवन बीमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, नागरिक बचत योजना ,किसान विकास पत्र यासारख्या योजना खेड्यापाड्यातील सामान्य नागरिकांसाठी लाभदायक असून त्या पोहचविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त टपाल सेवा नागपूरचे संचालक पवन कुमार डालमिया यांच्याहस्ते प्रचारासाठी कार्यालयीन वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सहायक संचालक शशीन राय उपस्थित होते. जायभाये यांनी सादरीकरणातून योजनांची माहिती दिली. नागपूर क्षेत्रात २४९ आधार अद्ययावतीकरण आणि नोंदणी केंद्र असून ३० सप्टेंबरपर्यंत या केंद्रावर ३ लाख ८९ हजार ९७ व्यवहार करण्यात आले. त्यांनी पंचतारांकित गावांच्या योजनेबाबत सांगितले, नागपूर क्षेत्रात सुकन्या योजनेअंतर्गत २८ गावे पूर्ण झाले असून पीएलआय ग्राम म्हणजे संपूर्ण बीमा ग्राम योजनेअंतर्गत २१६ गावे विमा ग्राम म्हणून समाविष्ट झालेली आहेत.
५४ हजार पासपोर्ट अर्जावर प्रक्रिया
पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांनासुद्धा प्रतिसाद मिळत असून नागपूर लोकसभा क्षेत्रात पासपोर्ट सेवा केन्द्र कार्यरत झाले आहेत. आतापर्यंत या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४ हजार ९०४ पारपत्रांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात आली आहे.