आयपीएस विनिता साहू यांची नागपुरात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:06 AM2019-07-20T00:06:24+5:302019-07-20T00:08:50+5:30
भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य राखीव दल चारचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य राखीव दल चारचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.
२०१० च्या तुकडीच्या आयपीएस असलेल्या विनिता साहू यांनी सिंधुदुर्गला अतिरिक्त अधीक्षक आणि नांदेड तसेच वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची भंडारा येथे २०१५ मध्ये बदली झाली होती. विनिता साहू भंडारा येथे पोलीस अधीक्षक असताना २०१७ मध्ये त्यांनी मोबाईल पोलीस चौकीचा अनोखा उपक्रम राबवून राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुरक्षा यंत्रणेचे लक्ष वेधले होते. दुर्गम भागातील गोरगरिब नागरिक अन्याय अत्याचार होऊनही पोलिसांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्या भागातील गुन्हेगार निर्ढावतात. यावेळी या उपक्रमानुसार त्यांनी गावोगावी मोबाईल पोलीस चौकी निर्माण केल्या होत्या. त्यानुसार, दर शनिवारी पोलीस त्या चौकीत जाऊन बसायचे आणि नागरिकांच्या, विशेषत: महिला-मुलींच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. त्या प्रत्येक तक्रारीवर साहू यांचे लक्ष राहत होते. त्यामुळे तक्रारीनुसार पोलीस संबंधित दोषींवर कारवाईही करायचे. त्यामुळे मोबाईल पोलीस चौकीचा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. अशाच अनेक उपक्रमांनी विनिता साहू यांनी राज्य पोलीस दलाचा भंडाऱ्याकडे लक्षवेध केला होता. आज पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या गेल्या. त्यानुसार विनिता साहू यांची नागपूरला उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर, यापूर्वी नागपुरात उपायुक्त म्हणून सेवा देणारे आणि नंतर बीडला पोलीस अधीक्षक म्हणून गेलेले जी. श्रीधर यांचीही नागपुरात बदली झाली आहे. ते एसआरपीएफच्या ग्रूप चारला कमांडंट म्हणून रुजू होणार आहेत. हसतमुख आणि मितभाषी मात्र कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून श्रीधर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.