नागपुरात इराणी लुटारुंची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:10 AM2018-05-23T11:10:39+5:302018-05-23T11:17:47+5:30

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा लावण्यात सीताबर्डी पोलीस यशस्वी ठरले. या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

Iranian bandits arrested by Nagpur police | नागपुरात इराणी लुटारुंची टोळी पकडली

नागपुरात इराणी लुटारुंची टोळी पकडली

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या वेशात विविध राज्यात हैदोसमध्य प्रदेशात सिनेस्टाईल अटक, १२ लाखांचे सोने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा लावण्यात सीताबर्डी पोलीस यशस्वी ठरले. या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. हुमायूं जाफरी (वय ४३, रा. आम्बिवली मुंबई) आणि इमरान अली नाजिर अली (वय २५, रा. टिकरीटोला, शहाडोल, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त राकेश ओला आणि सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त राजेश बोरावके उपस्थित होते.
३० एप्रिल २०१७ ला या टोळीतील गुन्हेगारांनी सीताबर्डी, अंबाझरी, बेलतरोडी तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या चार तासात चार ज्येष्ठ नागरिकांचे लाखोंचे लाखोंचे दागिने लंपास केले होते. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
ज्या भागात गुन्हा घडला, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारूंचे छायाचित्र कैद झाल्याने गुन्हे शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी या लुटारुंचा शोध घेण्यासाठी कामी लागले होते. या छायाचित्राच्या आधारे सीताबर्डीच्या पोलीस पथकाने शोध सुरू केला असता आरोपी १६ मे रोजी छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये असल्याची आणि तेथून ते इटारसीमार्गे रेल्वेने मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे एक पथक लुटारुंना जेरबंद करण्यासाठी इटारसीला पाठविले. मात्र, लुटारुंनी त्यांचा मुंबईचा बेत रद्द केला होता. ते बिहारकडे जाणार असल्याचे पोलीस पथकाला कळले. त्यावरून पोलिसांनी लगेच अंबिकापूर गाठले. तेथील इराणी वस्तीत पोलिसांनी हुमायूं जाफरीच्या मुसक्या बांधल्या. त्याने उर्वरित आरोपी मध्य प्रदेशातील बुढार येथे असल्याचे सांगितले. महाराष्ट, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशामधील लुटलेले दागिने बुढारमध्ये आम्ही वाटून घेणार आहोत, असेही त्याने सांगितले. त्यामुळे पोलीस पथकाने बुढार गाठले.

सिनेस्टाईल पलायन अन् पाठलाग
आरोपी इरफान अली बुढारमधील एका घराच्या छतावर दागिन्यांची बॅग घेऊन झोपून होता. पोलीस आल्याची जाणीव होताच तो घरांच्या छताछतावरून पळू लागला. पोलिसांनीही धाडसाचा परिचय देत त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला अन् सुमारे दीड किलोमीटर अंतर पाठलाग करून इरफानला पंकज रामटेके नामक शिपायाने पकडले. बॉडी बिल्डर असलेल्या आरोपी इरफानची यावेळी पंकजसोबत चांगलीच झटापट झाली. मात्र, हाताला दुखापत होऊनही धाडसी पंकजने आपले सहकारी येईस्तोवर इरफानला पकडून ठेवले अन् अखेर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या बांधल्या. त्याच्याजवळची सोन्याचे दागिने असलेली बॅग पोलिसांनी जप्त केली. ही कुणकुण लागताच या टोळीचा म्होरक्या सलमान ऊर्फ झाकिर अली आणि अबुझर जाफरी पळून गेले. अटकेतील आरोपी २५ मे पर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहेत.

अनेक राज्यात लुटमारीची कबुली
४अटकेतील आरोपी हुमायूं तसेच इरफानने नागपुरातील नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. कधी सीबीआय, कधी सीआयडी तर कधी पोलीस असल्याची बतावणी करून आम्ही विविध राज्यात लुटमार करतो, असेही त्यांनी सांगितले. मोठ्या शहरात रेल्वेने जायचे. तेथील मोटरसायकल चोरायची अन् गुन्हे करून फरार व्हायचे, अशी त्यांची कार्यपद्धत असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. जेथे कुठे मुक्कामाला हे आरोपी राहतात, तेथे ते घराच्या छतावरच झोपतात. ऐनवेळी पोलीस आले तर छतावरून पळून जाणे सोपे असल्याने ते ही खबरदारी घेतात. इरफानच्या ताब्यातून पोलिसानी सोनसाखळ्या, अंगठ्या, मंगळसूत्र तसेच अन्य असे ७०० ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके, ठाणेदार हेमंत खराबे यांच्या नेतृत्वात पो. नि. परमार, पीएसआय अरुण बकाल, नायक गजानन निशितकर, ओमप्रकाश भारतिया, शिपाई पंकज रामटेके, प्रकाश राजपल्लीवार, पंकज निकम आणि अंकुश घटी यांनी ही कामगिरी बजावली. कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पथकाला रिवॉर्ड देणार असल्याचेही यावेळी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सांगितले.

Web Title: Iranian bandits arrested by Nagpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा