आठ कोटी गॅस कनेक्शन्सचे गौडबंगाल; फसवी घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:45 PM2018-02-11T12:45:52+5:302018-02-11T12:46:10+5:30
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन्स देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा फसवी आहे.
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन्स देण्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा फसवी आहे. कारण २०१४ साली देशाची लोकसंख्या १२१ कोटी होती व कुटुंबांची एकूण संख्या २४.६६ कोटी होती व त्यापैकी ६६ टक्के म्हणजे १६.२५ कोटी कुटुंबांकडे गॅस कनेक्शन होते असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
भारताची लोकसंख्या दरवर्षी १.२० टक्क्याने वाढते. २०१७ साली भारताची लोकसंख्या १२५.३५ कोटी होती व कुटुंबांची संख्या २५.०७ कोटी आहे.
२०१८ मध्ये लोकसंख्या १२६.८५ कोटी व कुटुंबांची संख्या २५.३७ कोटी असेल असे मानव विकास मंत्रालयाचे संकेतस्थळ सांगते. दुसरीकडे पेट्रोलियम मंत्रालयाच्याच संकेत स्थळानुसार २०१४ ते २०१७ या काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दोन कोटी गॅस कनेक्शन्स दिल्याने एकूण गॅस कनेक्शन्स १९ कोटी झाल्याचे दिसते.
२०१८ ची अंदाजित लोकसंख्या १२६.८५ व कुटुंबांची अंदाजित संख्या २५.३७ कोटी आहे. जर १९ कोटी गॅस कनेक्शन्समध्ये ८ कोटीची भर २०१८ मध्ये पडली तर एकूण कनेक्शन्स २७ कोटींवर जाईल. तेव्हा ही १.६३ कोटी कुटुंबे जेटली कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अर्थसंकल्पात नाही.