परीक्षेत गैरप्रकार : नागपूर विद्यापीठाने बंद केले दोन परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:56 AM2018-11-11T00:56:25+5:302018-11-11T00:58:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी येणे सुरू झाले आहे. अशाच तक्रारीनंतर परीक्षा विभागाने दोन परीक्षा केंद्राला बंद केले आहे. यात कुही तालुक्यातील एक आणि समुद्रपूर जि. वर्धा येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर या परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याची तक्रार परीक्षा विभागाला मिळाली होती. यात म्हटले होते की, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याना अवैध पद्धतीने मदत केली जात होती. सोबतच ‘कॉपी’ रोखण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न केले नव्हते. समुद्रपूर येथील एका महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाबतही अशाच पद्धतीच्या तक्रारी येत होत्या. दोन्ही केंद्राबाबत मिळत असलेल्या तक्रारी लक्षात घेता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान दोन वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले. दोघांच्याही चौकशी अहवालात मिळालेल्या तक्रारी खऱ्या असल्याचे आढळून आले. यानंतर परीक्षा विभागाने केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.
सूत्रानुसार या केंद्राला बंद करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्राची मागणी करण्यात आली. त्यामुळे जवळच असलेल्या दुसऱ्या एका महाविद्यालयाला परीक्षा केंद्र बनवण्यात आले आहे.
या संदर्भात परीक्षा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारी गंभीर स्वरुपाच्या होत्या. चौकशी समितीत सहभागी असलेल्या सदस्यांनी परीक्षेदरम्यान केंद्राची पाहणी केली होती. त्यावेळी केंद्रात गैरप्रकार आढळून आला. यापुढे कुठल्याही परीक्षा केंद्रात असे प्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाला परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
१३ तारखेपासून दुसरा टप्पा
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा दुसरा टप्पा १३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. यात अडीच लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता ११० केंद्र बनवण्यात आले आहे.