कामात अनियमितता; महावितरण कनिष्ठ अभियंता सय्यद निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:15 PM2019-06-14T19:15:26+5:302019-06-14T19:16:03+5:30
कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे.
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी महावितरणची तीन सदस्यीय समिती कार्यालयीन वेळेत मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयात चौकशीसाठी गेली असता कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद या कार्यालयात गैरहजर होत्या, याबाबत चौकशी समितीने कार्यालयात उपस्थित बाह्यस्रोत कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता सय्यद सकाळपासून कार्यालयात आल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली. तद्नंतर वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल वंजारी यांचेशी संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद आपल्या सोबत मडसावंगी येथे असल्याची माहिती वंजारी यांनी समितिला दिली. या माहितीची शहानिशा करण्यास्तव समितीचे सदस्य मडसावंगी येथे गेले असता सय्यद तेथेही उपस्थित नव्हत्या. सबब, समितीने मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी केली असता नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळून आले. सोबतच अनेक कार्यालयीन दस्ताएवजावर खोडतोड केल्याचे निदर्शनास आले. शिवाय, ३ जनमित्रांनी ग्राहक तक्रारीचे निवारण करूनही त्यांची गैरहजरी लावण्यात आल्याची बाबही समितीच्या निदर्शनास आली. सय्यद या मुख्यालयी राहत नसल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीही यावेळी योग्य असल्याच्या समितीच्या निदर्शनास आल्या. या सर्व बाबींची चौकशी करून कामात हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे सय्यद यांच्या कामाची विस्तृत चौकशी होणे आवश्यक वाटल्याने महावितरणतर्फे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.