नागरिकांचा बेजबाबदारपणा: अखेर कळमना भाजीबाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:28 PM2020-04-13T20:28:29+5:302020-04-13T20:30:07+5:30
कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.
उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडतिया, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांना शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या किरकोळ बाजारात कवडीमोल भावात भाज्या विकून गावाकडे परत जावे लागेल. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करताना गर्दी केल्याने मनपा आयुक्तांना अखेर कठोर निर्णय घ्यावा लागला. बाजारपेठा बंद झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पायपीट करावी लागणार आहे. दारात नियमितपणे सहजरीत्या उपलब्ध होणारा भाजीपाला ग्राहकांना मिळणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्णयानंतर कॉटन मार्केट, कळमन्यासह रेशीमबाग मैदान, राजाबाक्षा मैदान, गाडीखाना मैदान, बुधवार बाजार (सोमवारी पेठ) बंद झाले आहेत.
कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, कळमना भाजीबाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता कळमना बाजारात अडतियांची बैठक घेतली आणि तात्काळ सोमवारपासून बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. पण व्यापारी आणि अडतियांनी बाजू मांडताना रात्री आणि पहाटेपर्यंत शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणतात. या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांनी भाज्या कुठे विकाव्यात, हे संकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार सुरू ठेवावा, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी सोमवारी बाजार सुरू ठेवून नंतर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कळमना भाजीबाजार बंद राहणार असल्याचे गौर यांनी सांगितले.
बाजारात गर्दी होत असल्याच्या कारणावरून १२ दिवसांपूर्वी ५० अडतिये व व्यापारी आणि १०० गाड्यांना बाजारात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याचे पालन करण्यात येत होते. ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दारातच भाज्या मिळत असतानाही बेजबाबदारपणे त्यांनी मुख्य बाजारात गर्दी केल्याचा फटका अखेर शेतकऱ्यांना बसला आहे. नागरिकांमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक तेवढ्याच भाज्यांची खरेदी करावी, असे गौर यांनी सांगितले.