सिंचन घोटाळ्यात अधिका-यांवर ठपका; नागपुरात चार गुन्हे दाखल, ‘एसीबी’च्या तक्रारीत मात्र राजकीय नेत्यांचा उल्लेख नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 05:58 AM2017-12-13T05:58:03+5:302017-12-13T05:58:44+5:30
नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आज अचानक सक्रिय होत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. सिंचन विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत तसेच बांधकामात
गैरप्रकार झाल्याचा जोरदार आरोप झाला होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी नागपूर एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक युनिटचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने या गैरव्यवहाराची प्रदीर्घ चौकशी केली.
या चौकशीमध्ये संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे
उघड झाले. जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, विभागीय
लेखाधिकारी तसेच कालव्याच्या कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागीदार, आममुखत्यारपत्रधारक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले होते.
हा चौकशी अहवाल चौकशी अधिकाºयांनी सादर केल्यामुळे मंगळवार, १२ डिसेंबरला एसीबीच्या अधिकाºयाने नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तक्रार काय होती?
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखा कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढवण्यात आले. तसेच अवैधस्तरावर निविदेला स्वीकृती/मंजुरी देण्यात आली. पूर्वअर्हता अर्जाच्या छाननीदरम्यान अपात्र कंत्राटदाराला गैरमार्गाचा अवलंब करून पात्र ठरविण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे बयाणा रकमेचे ‘डीडी’ देऊन निविदा प्रक्रियेदरम्यान संगनमत करून गैरव्यवहार (कार्टेलिंग) केल्याचा आरोप तक्रारीत केला होता.
यांच्यावर गुन्हा दाखल
उमाशंकर पर्वते (कार्यकारी अभियंता), सी. टी. जीभकाटे (विभागीय लेखाधिकारी), डी. डी. पोहेकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता), दे. पा. शिर्के (कार्यकारी संचालक) तसेच ए. जी. भांगडिया, नागपूर या फर्मचे आममुखत्यारपत्रधारक फिरदोस खान पठाण यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.