सिंचन घोटाळ्याचा अहवाल लवकरच

By admin | Published: August 21, 2015 03:08 AM2015-08-21T03:08:47+5:302015-08-21T03:08:47+5:30

कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यांपैकी दोन मोठ्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे.

Irrigation scam report soon | सिंचन घोटाळ्याचा अहवाल लवकरच

सिंचन घोटाळ्याचा अहवाल लवकरच

Next

चौकशी अंतिम टप्प्यात : एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची माहिती
नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यांपैकी दोन मोठ्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक राजीव जैन यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना उपरोक्त माहिती दिली.
देशभर खळबळ उडवून देणाऱ्या आणि राज्यातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या कोट्यवधींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सरकारने एसीबीकडे सोपविली आहे. त्यातील काही प्रकल्पाची चौकशी नागपूर विभागाच्या एसीबीकडून केली जात आहे. अशाच पैकी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या बाजूच्या तब्बल ११ (१२ ते २३ ) किलोमीटर मधील बांधकामाच्या भ्रष्टाचाराची तसेच मोखाबर्डी प्रकल्पातील गैरव्यवहाराची एसीबीच्या स्थानिक चमूने प्रदीर्घ चौकशी केली आहे. संबंधित तज्ञांच्या मदतीने सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत करण्यात आलेली ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. त्यासंबंधीचा कागदोपत्री अहवाल तयार झाल्यानंतर तो एसीबीच्या महासंचालकांकडे सादर केला जाईल, असे जैन यांनी सांगितले. चौकशी दरम्यानच्या बाबी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या अडचणींवर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यापूर्वी काही बोलणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाईल्स देण्यासाठी बरीच टाळाटाळ केल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांकडून पाठपुरावा झाल्यानंतर या फाईल्स मिळाल्या. त्यानंतर संबंधित तज्ज्ञ आणि एसीबीच्या पथकाने एकेका नोंदीची बारीकसारीक तपासणी केली. घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केल्यानंतर कामाच्या दर्जाचेही नमुने गोळा करण्यात आले.
या गैरव्यवहाराचे कोण कोण लाभार्थी आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याचे जैन म्हणाले. त्यासाठी या प्रकल्पातील कंत्राटदारांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती तपासल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे, त्याबाबत अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट करतानाच निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लवकरच या गैरव्यवहाराचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून पुढच्या कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Irrigation scam report soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.