सूत्रधार एक व्यक्ती की संघटना? फहीम खानची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:03 IST2025-03-20T11:02:57+5:302025-03-20T11:03:36+5:30
या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती सूत्रधार होता की, एखाद्या संघटनेचा यात हात होता, याचाही तपास सुरू आहे.

सूत्रधार एक व्यक्ती की संघटना? फहीम खानची चौकशी सुरू
नागपूर : हिंसाचारामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. लोकसभेची निवडणूक लढविलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानवर पोलिसांची संशयाची सुई आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती सूत्रधार होता की, एखाद्या संघटनेचा यात हात होता, याचाही तपास सुरू आहे.
‘लोकमत’च्या हाती आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार फहीम खान शमीम खानने (वय ३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) विहिंप बजरंग दलाच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविला व गणेशपेठ पोलिस ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन करणाऱ्या नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी समजावले होते
पोलिसांनी शांतता ठेवण्याबाबत समज दिली. तरीही पाचशे ते सहाशे लोक एकत्रित आले. सर्वांनी तत्काळ घरी जावे, अशी सूचना पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्याकडून देण्यात आली होती.
पोलिसांनी फहीम खान व त्याच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्याला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
५० हून अधिक ताब्यात
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, आम्ही सूत्रधाराचा शोध घेत आहोत. जे लोक जमावात सहभागी झाले होते, त्यांनी कुणाला फोन केले, याचा सीडीआर काढण्यात येत आहे. दरम्यान, कोम्बिंग ऑपरेशन राबवत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. तीन ठाण्यांत सहा गुन्हे दाखल झाले.