टाइम-ट्रॅव्हल शक्य आहे का? हो, सिद्धांत म्हणून तरी हो!

By Shrimant Mane | Updated: January 13, 2025 14:20 IST2025-01-13T14:19:15+5:302025-01-13T14:20:06+5:30

Nagpur : गँवासिनो यांच्या सिद्धान्ताने टाइम- ट्रॅव्हल या कल्पनेला नवी मजा आणली आहे

Is time travel possible? Yes, in theory! | टाइम-ट्रॅव्हल शक्य आहे का? हो, सिद्धांत म्हणून तरी हो!

Is time travel possible? Yes, in theory!

नागपूरस्वतःपुरते का होईना, पण काळाचे चक्र उलटे- सुलटे फिरवून भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाणे शक्य झाले तर काय होईल? आनंद की कमालीचा मानसिक गुंता? वर्तमानाच्या मागे किंवा पुढे काही बदलही करता आला तर? या व अशा कित्येक कल्पना विज्ञानाशी ओळख झाल्यापासून माणसांच्या मनात आहेत. त्यालाच टाइम-ट्रॅव्हल म्हणतात. एखादी व्यक्ती भूतकाळात गेली आणि आजोबांची अपत्यप्राप्तीच रोखली तर ट्रॅव्हलरचे अस्तित्वच संकटात येईल ना! या गुंत्याला नाव आहे - ग्रँडफादर पॅराडॉक्स. त्यामुळेच अधूनमधून अनेकजण भूत किंवा भविष्यात डोकावल्याचा दावा करतात खरे; परंतु, पुरावे नसतात; कारण जे घडून गेले किंवा घडणार आहे, त्यात हस्तक्षेप करता येत नाही. स्वप्नासारखे ते केवळ पाहता येते.


हा ग्रँडफादर पॅराडॉक्स नावाचा गुंता किंवा पेच बाजूला ठेवून टाइम-ट्रॅव्हल शक्य आहे, असा सिद्धांत एका भौतिकशास्त्रज्ञाने मांडला आहे. लोरेंझो गँवासिनो हे त्यांचे नाव. अमेरिकेतील टेनेसी प्रांतात नॅशव्हिले येथे १८७३ मध्ये स्थापन झालेल्या वंडरबिल्ट युनिव्हर्सिटीत ते संशोधन करतात. इटालियन शास्त्रज्ञ कार्लो रोव्हेली यांनी २०१९ मध्ये मांडलेली संकल्पना पुढे नेताना त्यांनी सापेक्षता, क्वांटम मेकॅनिक्स व थर्मोडायनामिक्स या तिन्हींच्या मूलभूत तत्त्वांच्या आधारे सैद्धान्तिक मांडणी केली: वस्तुमान किंवा गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहांसारखे संपूर्ण विश्व किंवा ब्रह्मांड एका गतीने फिरू लागले तर टाइम-ट्रॅव्हल शक्य आहे. गेल्या १२ डिसेंबरला 'क्लासिकल अँड क्वांटम ग्रॅव्हिटी' या नियतकालिकात हा सिद्धांत प्रसिद्ध झाला.


आयझॅक न्यूटन यांना वाटत होते की, आपल्या वेळेच्या आकलनावर विद्युत व चुंबकीय लहरींचा प्रभाव असतो. वरवर हे एका सरळ रेषेने चालते. एकेक क्षण मागे पडतो. वर्तमानातील क्षण भूतकाळात जातात व भविष्यातील क्षण जवळ येतात. काहींचे अंदाज बांधता येतात. ते कधी नजीकच्या, तर काही दूरच्या भविष्यकाळाचे असतात. यातून एक अंतर्ज्ञान साकारत जाते. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या १९१५ मधील सामान्य सापेक्षता सिद्धांताने मात्र हे अंतर्ज्ञानाचे गृहीतक खोडून काढले. गतीच्या नियमानुसार विद्युत व चुंबकीय लहरींचा परिणाम दरवेळी होईलच असे नाही. विशिष्ट परिस्थितीत हा नियम कोलमडून पडतो, असे आइनस्टाइन यांनी म्हटले. 


आइनस्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धान्तानुसार गुरुत्वाकर्षणामुळे ग्रहाभोवती (वरच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे) स्पेसटाइम कर्व्ह तयार होतो. संपूर्ण विश्व एका विशिष्ट गतीने, विशिष्ट मार्गावर फिरू लागले तर स्पेसटाइमही त्यासोबत ओढला जाईल आणि एक लूप तयार होईल. टाइम ट्रॅव्हल करणाऱ्या व्यक्तीने यानात बसून त्या लूपसोबत प्रवास केला तर ती पुन्हा जिथून प्रवास सुरू केला तिथेच येईल. घिरट्या घालणाऱ्या वस्तुमानामुळे अंतराळातील ब्लॅक होलसारखी एक अनामिक पोकळी तयार होईल. ही पोकळी स्पेसटाइमची रचनाच संपुष्टात आणील. 


या जोडीला गँवासिनो यांनी थर्मोडायनामिक्समधील एन्ट्रॉपी संकल्पना विचारात घेतली आहे. थर्मोडायनामिक्स कोडमधील किती ऊर्जा यांत्रिकी ऊर्जेत रूपांतरित झाली याचे मोजमाप म्हणजे एन्ट्रॉपी. तथापि, तापमान किंवा दाब मोजण्यासाठी जसे एकेक किंवा उपकरणे आहेत तशी एन्ट्रॉपीसाठी नाहीत. त्यामुळे ती कमी झाली की अधिक ते सांगता येत नाही. ती आहे हे नक्की. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तिचा वापर होतो. या एन्ट्रॉपीमुळेच आपल्यात दैनंदिन अनुभव नोंदवले जातात. वय वाढत जाण्याची जाणीव किंवा मेंदूत स्मृती साठविण्याची प्रक्रिया एन्ट्रॉपीमुळे घडते. तिचे प्रमाण कमी झाले तर स्मृती नष्ट होतील. वय वाढत जाण्याऐवजी कमी-कमी होत जाईल. एन्ट्रॉपी वाढीचा नियम भूतकाळ व भविष्यकाळ वेगळा करतो. तिच्यामुळे भूतकाळ आठवतो व भविष्य अज्ञात राहते. ही एन्ट्रॉपी व फिरणाऱ्या विश्वात लूपसोबत घिरट्या घालणारे यान या दोन्हींच्या संयोगातून एक क्षण असा येईल की, स्पेसटाइम कर्व्ह बदलेल आणि प्रवासी आपोआप भूतकाळ किंवा भविष्यकाळात पोहोचेल, असे गँवासिनो यांना वाटते.


टाइम-ट्रॅव्हलची ही शक्यता तूर्त सैद्धान्तिक स्तरावर, कागदावरच आहे... आणि महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य आहे का? स्टीफन हॉकिंग यांच्या १९९२ मधील प्रसिद्ध 'क्रोनोलॉजी प्रोटेक्शन कंज्युक्चेअर सिद्धान्ता 'नुसार भौतिकशास्त्राचे नियम असा टाइम लूप तयारच होऊ देणार नाहीत. त्यापूर्वीच कदाचित स्पेसटाइमचे तुकडे-तुकडे होतील. काहीही असो किंवा काहीही होवो, टाइम- ट्रॅव्हल ही कल्पना भन्नाट आहे आणि गँवासिनो यांच्या सिद्धान्ताने त्यात नवी मजा आणली आहे, हे नक्की. 

Web Title: Is time travel possible? Yes, in theory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.