ईश्वर कुंगवानी जेरबंद
By admin | Published: May 13, 2017 02:50 AM2017-05-13T02:50:10+5:302017-05-13T02:50:10+5:30
व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवून अनेकांना लाखोंचा फटका देणाऱ्या ईश्वर कुंगवानी नामक आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
भिसीचा गोलमाल : अनेकांची रक्कम हडपली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवून अनेकांना लाखोंचा फटका देणाऱ्या ईश्वर कुंगवानी नामक आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तो सध्या कोठडीत असून, अन्य दोन आरोपी फरार आहे.
आरोपी कुंगवानी आणि त्याचे नातेवाईक शहरातील विविध भागात मोठमोठ्या व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवतात. प्रत्येक महिन्याला भिसीत सहभागी होऊन लाखो रुपये जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांची ही भिसी कमिशन तसेच बोली तत्त्वावर चालवली जाते. एकूण रक्कमेपैकी जो सदस्य सर्वात जास्त रक्कम सोडण्यास तयार असेल त्याला भिसी मिळते. एकदम मोठी रक्कम एकत्रपणे हातात पडत असल्यामुळे अनेक जण जास्तीत जास्त रक्कम सोडायला तयार असतात. त्यानंतर भिसीची परतफेड दर महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता भरून केली जाते. हा भाग सदस्यांच्या नफा नुकसानीचा आहे. दुसरीकडे भिसी चालविणाऱ्याला दर महिन्याला लाखोंचे कमिशन मिळते. कुंगवानी त्याचमुळे विविध भागात व्यापाऱ्यांसाठी भिसी चालवित होता. त्याने या भिसीत रक्कम जमा करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये जमा केले आणि त्यांना भिसी न देता त्यांची फसवणूक केली. या संबंधाने ६५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा पाचपावली ठाण्यात १२ एप्रिलला दाखल झाला होता. तेव्हापासून ईश्वर कुंगवानी, पूजा आणि मोहित कुंगवानी हे पोलिसांना गुंगारा देत होते. दुसरीकडे पीडित व्यापारी त्यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री ईश्वर कुंगवानी काही व्यापाऱ्यांच्या हाती लागला. त्याला त्यांनी पाचपावली ठाण्यात नेऊन दिले. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे (ईओडब्ल्यू) असल्यामुळे पाचपावली पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेच्या हवाली केले. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार यांनी ईश्वर कुंगवानीला अटक करून कोर्टात हजर केले. फसवणुकीची लाखोंची रोकड त्याने लपवून ठेवल्यामुळे तसेच त्याच्या फरार साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याचे सांगून पोलिसांनी कोर्टातून त्याची १६ मे पर्यंत कोठडी मिळवली.
भिसीतून कोट्यवधींची माया
आरोपी कुंगवानी आणि त्याच्या नातेवाईकांनी भिसीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालत कोट्यवधींची माया जमविल्याची चर्चा आहे. त्याने अनेक आलिशान वाहनेही खरेदी केली. त्यातील एक वाहन गेल्या आठवड्यात कुंगवानीने विकले आणि तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पीडित व्यापाऱ्यांना कळाली. त्यामुळे त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.