शिक्षणाचे इस्लामीकरण करा, मॉडर्न शिक्षणदेखील द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:39+5:302021-08-18T04:11:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अफगाणिस्तान काबिज केल्यानंतर तालिबानकडून जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे दावे करण्यात येत आहेत; परंतु प्रत्यक्षात ...

Islamize education, give modern education too | शिक्षणाचे इस्लामीकरण करा, मॉडर्न शिक्षणदेखील द्या

शिक्षणाचे इस्लामीकरण करा, मॉडर्न शिक्षणदेखील द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अफगाणिस्तान काबिज केल्यानंतर तालिबानकडून जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे दावे करण्यात येत आहेत; परंतु प्रत्यक्षात तालिबानने अफगाणिस्तानने रुळावर आणलेल्या शिक्षण प्रणालीला लक्ष्य केले आहे. काबुलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या प्रतिनिधींनी कंदहार विद्यापीठात विविध विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. विद्यापीठांमधील विद्यार्थी देशाच्या मूळ विचारसरणीचा मार्ग भटकले आहेत, अशी चिंता व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये इस्लामिक विचार बिंबविण्यात यावे, असा फतवाच देत असताना तालिबान मॉडर्न शिक्षणप्रणालीविरोधात असल्याचा ठपका मिटविण्यात यावा, असे निर्देशदेखील दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मितीसाठी तालिबानने अशी दुटप्पी भूमिका घेतली असल्याची माहिती संबंधित विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये खासगी व सार्वजनिक मिळून ८५ हून अधिक विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था आहेत. ‘लोकमत’ने विविध विद्यापीठातील प्राध्यापकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तालिबानचे शिक्षणप्रणालीबाबतच्या भूमिकेसंदर्भातील बैठकीबाबत खुलासा झाला.

अफगाणिस्तानच्या उच्च विभागाचे पदाधिकारी, कंदहार विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्राध्यापक यांच्यासह संपूर्ण भागातील खासगी व सार्वजनिक विद्यापीठांचे प्रतिनिधींना तालिबानने तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सदस्य असलेले मौलवी अहमद शाह शाकीर यांनी अफगाणिस्तानच्या नव्या शासनकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिक्षणाचे संपूर्णपणे इस्लामीकरण करणे हा तालिबानचा अजेंडा असून, मदरसे, शाळा व विद्यापीठांमधील दरी कमी करण्यावर भर राहणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.

मॉडर्न शिक्षणाविरोधात असल्याचा ठपकादेखील मिटवा

एकीकडे शिक्षणाचे इस्लामीकरण करण्याचे निर्देशच तालिबानने दिले असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना मॉडर्न शिक्षणदेखील मिळाले पाहिजे, अशी भूमिका संबंधित बैठकीत मांडली असल्याची माहिती कंदहार विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. तालिबान मॉडर्न शिक्षणाच्या विरोधात कधीही राहणार नाही. मागील २० वर्षे आमच्यावर हा आरोप होतो आहे, तो दूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, असेदेखील तालिबानच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

विद्यार्थी हतबल, शिक्षणाचे काय होणार ?

कोरोनामुळे अफगाणिस्तानमधील विद्यापीठे बंद होती. आता परत संस्था सुरू होणार, असे चित्र असताना तालिबानने ताबा घेतला आहे. आता परत शिक्षणसंस्था सुरू होणार की नाही, परीक्षा होणार की नाही व आमची प्रगती होणार की नाही, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. काहींनी तालिबानला न घाबरता सोशल माध्यमांवर भावनादेखील व्यक्त केली आहे.

Web Title: Islamize education, give modern education too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.