शिक्षणाचे इस्लामीकरण करा, आधुनिक शिक्षणदेखील द्या; तालिबानचे शिक्षणतज्ज्ञांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:10 AM2021-08-18T11:10:08+5:302021-08-18T11:12:47+5:30
Nagpur News विद्यार्थ्यांमध्ये इस्लामिक विचार बिंबविण्यात यावेत, असा फतवा देतानाच तालिबान आधुनिक शिक्षणप्रणालीविरोधात असल्याचा ठपका मिटविण्यात यावा, असे निर्देशही दिले आहेत.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबानने सर्वप्रथम अफगाणिस्तान सरकारने रुळावर आणलेल्या शिक्षणप्रणालीला लक्ष्य केले आहे. काबूलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या प्रतिनिधींनी कंदहार विद्यापीठात विविध विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. विद्यार्थ्यांमध्ये इस्लामिक विचार बिंबविण्यात यावेत, असा फतवा देतानाच तालिबान आधुनिक शिक्षणप्रणालीविरोधात असल्याचा ठपका मिटविण्यात यावा, असे निर्देशही दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मितीसाठी तालिबानने अशी दुटप्पी भूमिका घेतली असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. (Education policy in Afganistan)
अफगाणिस्तानमध्ये खासगी व सार्वजनिक मिळून ८५ हून अधिक विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था आहेत. ‘लोकमत’ने विविध विद्यापीठातील प्राध्यापकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तालिबानच्या शिक्षणप्रणालीबाबतच्या भूमिकेसंदर्भातील बैठकीबाबत खुलासा झाला.
अफगाणिस्तानच्या उच्च विभागाचे पदाधिकारी, कंदहार विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्राध्यापक यांच्यासह संपूर्ण भागातील खासगी व सार्वजनिक विद्यापीठांच्या प्रतिनिधींना तालिबानने तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सदस्य असलेले मौलवी अहमद शाह शाकीर यांनी अफगाणिस्तानच्या नव्या शासनकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली.
‘तो’ ठपका मिटविण्याची धडपड
तालिबानने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणदेखील मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडल्याची माहिती कंदहार विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. तालिबान मॉडर्न शिक्षणाच्या विरोधात कधीही राहणार नाही. मागील २० वर्षे आमच्यावर हा आरोप होतो आहे, तो दूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, असे तालिबान प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
विद्यार्थी हतबल, शिक्षणाचे काय होणार ?
कोरोनामुळे अफगाणिस्तानमधील विद्यापीठे बंद होती. आता परत संस्था सुरू होणार, असे चित्र असताना तालिबानने ताबा घेतला आहे. आता शिक्षणसंस्था सुरू होणार की नाही, परीक्षा होणार की नाही, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. काहींनी तालिबानला न घाबरता सोशल माध्यमांवर भावनादेखील व्यक्त केली आहे.