अंबाझरीचे पाणी तुंबण्यासाठी जलपर्णी तर कारणीभूत नाही ना?
By निशांत वानखेडे | Published: September 27, 2023 06:33 PM2023-09-27T18:33:01+5:302023-09-27T18:33:16+5:30
काढलेल्या जलपर्णीचा ढीग काठावरच साचून : तलावातील हिरवा तवंगही यामुळेच
नागपूर : अंबाझरी तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्यानंतर तो ढीग काठावर तसाच ठेवण्यात आला होता. उन्हामुळे सुकून या जलपर्णीचा तंतूमय लगदा बनला आहे. अंबाझरीच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यात हिरव्या जलपर्णींसोबत सुकलेल्या जलपर्णींचा लगदाही वाहून गेला. नाल्यांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात हा लगदा अडकल्याने पाणी तुंबले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवारी अवघ्या काही तासात कोसळलेल्या पावसासोबत पाण्याचा मार्ग रोखून धरणाऱ्या जलपर्णींची भूमिका नाकारता येत नाही. अजूनही अंबाझरीच्या काठावर सुकलेल्या जलपर्णींचे मोठे ढिगारे तसेच आहेत. काही पाण्यासोबत वाहून गेले. याआधी अंबाझरी तलावात जलपर्णी नव्हती. गेल्या वर्षीपासून ती खूप झपाट्याने वाढत असून नियंत्रण न मिळवल्यास ती संपूर्ण तलावच गिळंकृत करेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. ही वनस्पती वाढल्यामुळेच अलीकडे मोठ्या प्रमाणात तलावाच्या पाण्यात हिरवा तवंग पसरला होता. त्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते.
अंबाझरीला मिसळणाऱ्या नाल्यात सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त दूषित पाण्याची समस्या कायम आहे. त्याबाबत केवळ चिंता व्यक्त केली जाते, मात्र उपाययोजना नाही. अंबाझरीत अजूनही मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहेत. पुन्हा मोठा पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नालेसफाईसोबतच जलपर्णीचे समूळ उच्चाटन हे देखील मोठे आव्हान उभे ठरले आहे.