ही तुमची तर मुलं-मुली नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:03 AM2019-12-10T11:03:06+5:302019-12-10T11:03:26+5:30
हैदराबाद व उन्नावच्या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर नागपूर कितपत सुरक्षित आहे? हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने मध्यरात्री १२ ते २ वाजेपर्यंत अनेक भागात फेरफटका मारला. त्यात धक्कादायक वास्तव समोर आले.
सुमेध वाघमारे, नरेश डोंगरे, मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकांनो...तुमची मुलं-मुली ‘स्मोक’ करतात? दारू पितात? रस्त्यावर झिंगतात? गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडसोबत रात्री उशिरापर्यंत ‘नाईट लाईफ’ एन्जॉय करतात? तुमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर ‘आमची मुलं अशी नाहीत’, असंच असेल! पण, जरा एखादवेळी घराबाहेर पडून पाहा. ही तरुणाई शिक्षणाच्या नावाखाली तुमच्याच पैशाच्या जोरावर ऐशोआरामी ‘लाईफ एन्जॉय’ करत आहे. तरुण-तरुणींचे घोळके रात्री रस्त्यावरच सिगारेटचे झुरके घेत मद्य व बिअर रिचवताना दिसताहेत. इतकेच काय रस्त्यावरच ते तोकडे कपडे घालून एकमेकांचे आलिंगन घेत चुंंबनही घेतात. इतक्यावर हे प्रकार थांबत नाहीत. फूटपाथच्या बाजूला चारचाकी वाहनाची पार्किंग करून ‘नाही ते’ प्रकार चालतात. पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन येते. ती समोर जात नाही तोच परत पुन्हा हुल्लडबाजी सुरू होते. तरुणींवर नजर ठेवून आपले सावज शोधणारे समाजकंटकही इथेच टपलेले असतात. हे प्रकार रोज सुरू आहेत. उपराजधानीत असे अनेक ‘स्पॉट’ आहेत, ज्यात दिवसागणिक वाढ होत आहे. हैदराबाद व उन्नावच्या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर नागपूर कितपत सुरक्षित आहे? हे पाहण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने मध्यरात्री १२ ते २ वाजेपर्यंत अनेक भागात फेरफटका मारला. त्यात अनेक धक्कादायक वास्तव समोर आले.
वेळ रात्री १ वाजताची. कडाक्याची थंडी त्यामुळे रस्त्यावर माणसांची, वाहनांची तशीही गर्दी कमीच. मात्र, रस्त्याच्या कडेला तरुणांचे घोळके अन् त्यात एक किंवा दोन तरुणी. कुणी सिगारेटचे झुरके घेताना तर काहींच्या हाती बाटल्या. बाटल्या दोन-तीन मिनिटांनी कधी एक, कधी दुसरा तर मध्येच एक तरुणी तोंडाला लावताना दिसते. त्यामुळे त्या बाटलीत पाणी असावे की आणखी दुसरे काही, त्याचा सहज अंदाज यावा. काही वेळेनंतर ही मंडळी झिंगल्यासारखी होतात. तरुण दुचाकी काढतात. एकाच्या मागे तरुणी बसते. तिच्या मागे पुन्हा एक दुसरा तरुण बसतो अन् नंतर दुसऱ्याही दुचाकीवर अशाच प्रकारे दोन तरुणांच्या मध्ये सिगारेटचे झुरके घेत तरुणी बसते अन् सुसाट वेगाने ते निघून जातात.
उपराजधानीतील विविध भागातील, वेगवेगळ्या मार्गावर हे चित्र जवळपास रोजच बघायला मिळते अन् काळजात धस्स होते. त्यांचे केस आणि वेश तसेच बातचीत बघता-ऐकताना त्या कॉलेज तरुणी असाव्यात, ही कल्पना येऊन जाते. कॉलेजमध्ये जात नसेल तरी चांगल्या शिकल्यासवरल्या असाव्यात, याची हमखास प्रचिती येऊन जाते. सोबतच प्रश्न पडतो की, एवढ्या रात्री या दोघींना (त्या दोघींच नव्हे तर तशाच अनेकींना!) कोणते काम असेल. त्या आता त्यांच्या मित्रांसोबत झिंगलेल्या अवस्थेत कुठे जात असतील. ज्या पद्धतीने त्या सिगारेटचे झुरके मारत दोन तरुणांच्यामध्ये बसून गेल्या, ते पाहता त्यांच्यासोबतचे ते तरुण त्यांचे भाऊ नक्कीच नसावे, याचीही खात्री पटते.
तोकड्या कपड्यात मित्राच्या मागे बसून मद्याची बाटली धावत्या दुचाकीवर शेअर करतानाही जवळपास रोजच मध्यरात्री काही तरुणी मध्यरात्री १ वाजतानंतर दिसून येतात. एवढ्या रात्रीपर्यंत त्या कोणते काम करीत होत्या, आता त्या मित्रासोबत कुठे जात असाव्यात, त्यांना कुण्या गुंडांनी, समाजकंटकांनी घेरले अन् काही घडले तर ..., दारूच्या नशेत टून्न झालेल्या मित्रांनीच घात केला तर..., हे आणि असेच काही प्रश्न मनात काहूर उठविणारे ठरावे. दिल्लीत निर्भयावर, कठुआ आणि उन्नाव येथील चिमुकल्यांवर तसेच हैदराबादमधील दिशावर माणसाच्या रुपात वावरणारे पशु तुटून पडले. पशुंना वयाचे भान नसते. हे या प्रकरणातून उघड होऊनही रात्री बेरात्री तरुणांच्या घोळक्यात झिंग होऊन सैराट झालेल्या तरुणींना ते कळत नाही का, असाही प्रश्न पुढे आला आहे.