सेलू ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:33+5:302021-02-05T04:38:33+5:30
कळमेश्वर : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कारासह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व विविध सन्मान पटकाविणाऱ्या गट ग्रामपंचायत सेलू (गुमथळा) ला ...
कळमेश्वर : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कारासह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व विविध सन्मान पटकाविणाऱ्या गट ग्रामपंचायत सेलू (गुमथळा) ला आयएसओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत सेलू येथे आयोजित कार्यक्रमात आयएसओ सल्लागार स्वप्नील म्हैस्के, राहुल मानवटकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत प्रशासक नंदू राऊत व ग्रामसेवक सुषम जाधव यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ग्रामपंचायत करवसुली, शुद्ध पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेशन, रेकॉर्डचे अचूक नियोजन, गाव आणि ग्रामपंचायत सौंदर्यीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळा व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता अभियान आदी प्रमुख बाबी तपासणीअंती सेलू (गुमथळा) ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले.
गट ग्रामपंचायत येथे विविध उपक्रम राबविताना गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, सहायक गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, पंचायत विस्तार अधिकारी यशवंत लिखार यांचे मार्गदर्शन लाभले.
आयएसओ मानांकन प्रमाणपत्र स्वीकारताना प्रशासक नंदू राऊत, ग्रामसेवक सुषम जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चनकापुरे, प्रकाश पांडे, मंजूषा भोयर, तेजस्विनी जुमडे, किशोर आसोले, गीता गायकवाड, चित्रा डोईफोडे, शशिकला माने, कुंती आसोले, वसंत भोयर, रमेश पाटील, डाटा ऑपरेटर प्रिया रंगारी आदींची उपस्थिती होती.